हीरकमहोत्सवी वर्षात राज्य नाट्य स्पर्धेला "ब्रेक'?...कोरोना इफेक्‍ट; "सांस्कृतिक'ची चुप्पी, गतवर्षीची बक्षिसे-देयके प्रलंबित 

जयसिंग कुंभार
Tuesday, 6 October 2020

सांगली-  महाराष्ट्राची जगात ओळख असलेल्या राज्य नाट्य स्पर्धांना 60 वर्षांत यंदा प्रथमच "ब्रेक' मिळणार आहे. अद्याप घोषणा झाली नसली तरी स्थिती तशीच आहे. दरवर्षी 31 ऑगस्टपूर्वी स्पर्धेची नावनोंदणी होते. यंदा ऑक्‍टोबर उजाडला तरी सांस्कृतिक कार्य संचालनालयात सामसूम आहे. कोरोनामुळे यंदा गतवर्षीचा बक्षीस समारंभ, खर्चाची देयके यांचाही पत्ता नाही. 

सांगली-  महाराष्ट्राची जगात ओळख असलेल्या राज्य नाट्य स्पर्धांना 60 वर्षांत यंदा प्रथमच "ब्रेक' मिळणार आहे. अद्याप घोषणा झाली नसली तरी स्थिती तशीच आहे. दरवर्षी 31 ऑगस्टपूर्वी स्पर्धेची नावनोंदणी होते. यंदा ऑक्‍टोबर उजाडला तरी सांस्कृतिक कार्य संचालनालयात सामसूम आहे. कोरोनामुळे यंदा गतवर्षीचा बक्षीस समारंभ, खर्चाची देयके यांचाही पत्ता नाही. 

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून स्पर्धांच्या आयोजनाला सुरवात झाली. गेल्या वर्षी 59 व्या स्पर्धा झाल्या. नाटक, तमाशा, कुस्ती आणि राजकारण हे मराठी माणसाचं वेड. नाटकाचं वेड सतत वृद्धिंगत करण्यात या राज्य नाट्य स्पर्धेचा वाटा मोठा राहिला. या स्पर्धेनेच देश, राज्याला नाट्य-चित्रपटसृष्टीसाठी कलाकार सतत पुरवले. यंदा 60 व्या स्पर्धा अधिक भव्य घ्यायचा संकल्प गतवर्षी झाला. मार्चपासून कोरोनाचे संकट सुरू झाले. त्यात सारे संकल्प वाहून गेले. 

गेल्या वर्षी विविध केंद्रांवर 400 संस्थांनी प्रयोग सादर केले. त्याचे निकाल जाहीर झाले. मात्र, बक्षीस समारंभ अजून झालेला नाही. स्पर्धक संस्थांना दिला जाणारा सहा हजारांचा निर्मिती खर्च, प्रवास खर्च, जेवण भत्ता अशी प्रत्येक संस्थेला मिळणारी दहा-बारा हजारांची देयकेही मिळालेली नाहीत. दरवर्षी 31 मार्चपूर्वी ही देयके दिल्यावर पुढील वर्षाच्या स्पर्धांचे वेध हौशी कलावंतांना लागतात. 31 ऑगस्टपूर्वी महिना-दोन महिने आधी कोणतं नाटक करायचं, हे ठरतं. त्याच्या तयारीला सुरवात होते. यंदा अजून काहीच हालचाल नाही. पारितोषिक प्रदानच्या निमित्ताने गेल्या वर्षीच्या विजेत्यांचे नाट्यप्रयोगही मुंबईसह विविध केंद्रांवर दरवर्षी होतात. कलाकार त्यासाठी तयारीने उतरतात. यंदा या समारंभाचीही वाच्यता नाही, तयारीचा पत्ताच नाही. ऑक्‍टोबर उजाडला तरी नावनोंदणीही नाही. इथून पुढे कार्यक्रम जाहीर झाला, तरी डिसेंबरपूर्वी या स्पर्धा व्हायची शक्‍यता नाही. त्यामुळे 60 व्या स्पर्धा पुढील वर्षीच होतील, असे दिसते. किमान गेल्या वर्षीच्या स्पर्धांची बक्षिसे समारंभ टाळून दिली जावीत, अशी अपेक्षा आहे. 

गेल्या वर्षीची बक्षिसे आणि देयके संस्थांना दिली जावीत, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. देयके या महिन्याअखेरीस दिली जातील, असे सांगण्यात आले. आता वर्षअखेर आली. महाविद्यालयांचेच पहिले सत्र सुरू व्हायची शक्‍यता आहे. त्यामुळे पुढील वर्षीच स्पर्धा व्हाव्यात. 
- मुकुंद पटवर्धन, केंद्र समन्वयक, राज्य नाट्य स्पर्धा 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Break 'to state drama competition in Diamond Jubilee year?