ब्रेकिंग ः सापडले... सापडले... कर्जतचे जेल तोडणारे सापडले, तिघांच्या मुसक्या आवळल्या 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची सात पथके रवाना झाली होती. त्यातील एका पथकाने मोठ्या शिताफीने तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

कर्जत : कर्जतच्या तुरूंगाची कौले उचकटून धूम ठोकलेले आरोपी हे खतरनाक आहेत. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा तसेच पोक्सोचा गुन्हाही दाखल आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. वरिष्ठ पातळीवरूनही या घटनेचा पाठपुरावा केला जात होता.

कसं काय पकडलं

आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची सात पथके रवाना झाली होती. त्यातील एका पथकाने मोठ्या शिताफीने तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पुणे, दौंड परिसरात ही कारवाई केली आहे. त्या आरोपींना कर्जतकडे आणण्यात येत आहे. काल रात्री व आज पहाटे ही कारवाई केली असल्याचे समजते. या कारवाईची माहिती पोलिसांनी गुप्त ठेवली आहे. 

नेमके काय घडलं होतं

त्या दिवशी तुरुंगरक्षक जालिंदर माळशिखरे हे तपासणी करीत चार नंबरच्या बराकीत गेले होते. तेव्हा त्यांना पाच आरोपी रफ्फूचक्कर झाल्याचे दिसले. त्या बराकीत एकूण सहा होते. त्यापैकी पाचजण पळून गेले. जा आरोपी पळून गेलेला नाही, तोही पूर्वाश्रमीचा पोलीस कर्मचारी आहे. नेमका तो का गेला नाही की त्याने त्या पाच आरोपींना पळून जाण्यास मदत केली. या दृष्टीने तपास केला जात होता. 

कोण कोण पकडलं बरं 
अक्षय रामदास राऊत, चंद्रकांत महादेव राऊत (दोघेही पारेवाडी जामखेड), मोहन कुंडलिक भोरे (रा. कवडगाव, जामखेड) ज्ञानेश्वर कोल्हे (जवळा, जामखेड), गंगाधर लक्ष्मण जगताप अशी पळून गेलेल्या आरोपींची नावे आहेत. पुण्यातील एका व्यापाऱ्याचा क्रूरपणे खून केला होता. त्या गुन्ह्यात हे अटकेत होते. एका आरोपीविरूद्ध शस्त्र बाळगल्याचा गुन्हा आहे. मुलीचा लैगिक छळ केल्याचा यातील जगताप याच्यावर आरोप आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे आरोपी कर्जतमधील तुरूंगात होते. यातील भोरे व कोल्हेला पकडले आहे. जगताप याच्याही मुसक्या आवळल्या आहेत. 

असे पळाले ते पाचजण 
आरोपींनी जेल तोडल्यानंतर ते अंधारात चालत चालत कुळधरण रस्त्यापर्यंत गेले. तेथून ते मोटारसायकलींवर श्रीगोंद्याच्या दिशेने गेले. हिरडगाव रस्त्यावरून त्यांची फाटाफूट झाली. तेथून ते एका मोटारीतून वेगवेगळ्या ठिकाणी पांगले. यातील जगताप हा वेगळ्या दिशेने गेला. तो कर्जत तालुक्यातील म्हाळंगीचा आहे. रात्रीच्या अंधारात त्याने एका मित्राला जवळ केले. करमाळा तालुक्यातील सावडी येथे त्याने आसरा घेतला. तो तेथे असल्याची पोलिसांना खबर लागली. पोलिसांनी तेथे जाऊन शोध घेतला. मात्र, त्यापूर्वीच जगताप तेथून परागंदा झाला होता. 

पोलिसांनी अशी केली आयडिया 
पोलिसांनी जगताप याच्या घरावर पाळत ठेवली. तेथेही तो येत नव्हता. अधिक तपासासाठी पोलिसांनी त्याच्या घरातील लोकांना ठाण्यात आले. त्यांच्याकडूनही काहीही माहिती मिळत नव्हती. मग पोलिसांनी त्याला फोन करायला लावला. त्याने तो रिसिव्ह केला. आणि घरी येण्यास सांगितले. तो म्हाळंगीत आला असता त्याच्यावर साध्या वेशातील पोलिसांनी झडप घातली. आता त्याच्याकडे मोबाईल आला कोठून, त्यांना पळून जाण्यासाठी मोटारसायकली व मोटार कशी उपलब्ध झाली, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. 

पत्रकार परिषदेत उलगडेल आरोपींचा डाव

कर्जत विभागाचे पोलीस उपअधीक्षक संजय सातव हे या घटनेवर रात्रंदिवस लक्ष ठेवून होते. उर्वरित दोघांनाही लवकरच पकडले जाईल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. कर्जतमधून पळालेल्या या घटनेबाबत ते पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यानंतरच आरोपींच्या या पलायन नाट्यावर प्रकार पडेल. आणि त्यांनी कसे प्लॅनिंग केले हे समोर येईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Breaking: Karjat accused arrested