ब्रेकिंग न्यूज ः श्रीगोंद्यात उद्यापासून पेट्रोल बंदी?

संजय आ. काटे
सोमवार, 23 मार्च 2020

या अधिकाऱ्यांनी अनेकांना हात जोडून नाहक रस्त्यावर फिरू नका कोरोनोबाबत जबाबदारीने वागा अशा सूचनाही केल्या. मात्र लोकांमध्ये जनजागृती होणेऐवजी हलगर्जीपणा वाढत असल्याने माळी यांनी जिल्ह्यातील पहिला निर्णय घेतला आहे. 

श्रीगोंदे : विनाकारण दुचाकी आणि चारचाकी घेऊन फिरणाऱ्या चालकांवर गंडांतर आणण्यासाठी श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र माळी यांनी पेट्रोल व डिझेल चालकांना ठराविक वेळेतच विक्री करण्याचा फतवा काढला आहे. उद्यापासून ( मंगळवार) दुचाकीस्वरांना इंधन बंदी करण्याचा निर्णय होऊ शकतो असे संकेत माळी यांनी 'सकाळ'ची बोलताना दिले. 

श्रीगोंद्यात लॉक डाऊन असतानाही रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनांच्या संख्येत फरक पडलेला दिसत नसल्याने आज प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार महेंद्र माळी, पोलीस निरीक्षक दौलत जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर हे रस्त्यावर उतरले. वैतागलेल्या माळी यांनी तर हातात काठी घेऊन नाहक टारगटगिरी करणाऱ्या दुचाकीस्वारांना सरकारी काठीचा प्रसाद दिला.

या अधिकाऱ्यांनी अनेकांना हात जोडून नाहक रस्त्यावर फिरू नका कोरोनोबाबत जबाबदारीने वागा अशा सूचनाही केल्या. मात्र लोकांमध्ये जनजागृती होणेऐवजी हलगर्जीपणा वाढत असल्याने माळी यांनी जिल्ह्यातील पहिला निर्णय घेतला आहे. 

पेट्रोल पंपचालकांना सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेतच वाहनांना इंधन विकण्याचा आदेश काढला. यातून माध्यमांचे प्रतिनिधी, वितरक, वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टर व कर्मचारी तसेच सरकारी यंत्रणा यांना वगळण्यात आले आहे. त्यासाठी या लोकांना ओळखपत्रे आवश्यक केली आहेत.

दरम्यान आजच्या दुचाकीस्वारांचा वर्तन पाहून माळी कमालीचे अस्वस्थ झाले.  'सकाळ'शी बोलताना ते म्हणाले, लोकांमध्ये जनजागृती गरजेची आहे. याबाबत लोक अजूनही बिनधास्त वागत असल्याने उद्यापासून दुचाकीस्वारांना कुठल्याही पंपावर पेट्रोल देण्यात येणार नाही, असा आदेश केला जाऊ शकतो. त्यामुळे रस्त्यावर फिरणे करणाऱ्यांची संख्या कमी होऊन संसर्ग ग्रामीण भागात येणार नाही याची दक्षता तरी घेतली जाईल.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Breaking News Petrol banned in Shrigonda tomorrow