बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणी सांगलीतील दलाल रडारवर

प्रमोद जेरे
Sunday, 20 September 2020

बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणी सांगलीमधील काही क्रीडा संस्थांचे दलाल पोलिसांच्या रडारवर आहेत. या प्रकरणाची पाळेमुळे मुंबईसह आसामपर्यंत पसरल्याचेही पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

मिरज (जि. सांगली) : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या सतर्कतेमुळे उघडकीस आलेल्या बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणी अटक केलेल्या मिरज येथील दीपक दादासाहेब सावंत (वय 41) या संशयितास 22 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. याप्रकरणी सांगलीमधील काही क्रीडा संस्थांचे दलाल पोलिसांच्या रडारवर आहेत. या प्रकरणाची पाळेमुळे मुंबईसह आसामपर्यंत पसरल्याचेही पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. 

सांगलीतील विजय बोरकर या पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराने राज्यस्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याचे प्रमाणपत्र आयोगास सादर केले. याबाबत राज्य लोकसेवा आयोगाने याची खातरजमा करून घेतली असता हे प्रमाणपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी कोल्हापूरचे क्रीडाधिकारी श्री. भास्करे यांनी कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर या बनावट प्रमाणपत्राचा मोठा राज्यव्यापी घोटाळा उघडकीस आला. यामध्ये शेकडो खोटी प्रमाणपत्रे सरकार दरबारी दाखवून अनेकांनी सरकारी निमसरकारी नोकऱ्या मिळवल्या आहेत. राज्यातील औरंगाबाद, पुणे तसेच मुंबईसह सर्व विभागांमध्ये अशा प्रकारची बनावट प्रमाणपत्रे दिल्याचे स्पष्ट झाले. 

या प्रकरणी कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलिसांनी सागंलीच्या विजय बोरकरसह मिरज येथील कंत्राटी क्रीडा शिक्षक दीपक दादासाहेब सावंत आणि राज्य जिमनॅस्टीक असोसिएशनचा पदाधिकारी महेंद्र चेंबूरकर (रा. मुंबई) या तिघांना अटक केली. यापैकी दीपक सावंत याला 22 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्याच्याकडील चौकशीत सांगली जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रातील काही दलाल आणि संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची नावे निष्पन्न झाली. या सर्वांवरही अटकेची टांगती तलवार आहे. या प्रकरणाची व्याप्ती मुंबईसह आसाम आणि अन्य काही राज्यांपर्यंत पोहचल्यांने पोलीस यंत्रणेसमोर तपासाचे मोठे आव्हान आहे. 

दलाल आणि पोशिंद्याचे धाबे दणाणले. 
मिरज येथील दीपक सावंत यांच्या अटकेमुळे सांगली जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रातील दलाल आणि त्यांच्या पोशिंद्या आधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. यापैकी अनेक दलाल हे कालपरवापर्यंत जिल्ह्यापासून गावपातळीपर्यंत क्रीडाधिकारी म्हणूनच वावरत असत. 

संपादक : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Broker on radar in Sangli in fake sports certificate case