
बहिणींनी आंब्याची २०० रोपे महिलांना देऊन पर्यावरण संरक्षणाला हातभार लावण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे.
निपाणी (बेळगाव) : पर्यावरणाचे संतुलन बिघडल्याने विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मात्र सण, समारंभ व विधींसाठी झाडांची कत्तल काही थांबलेली नाही. अशा परिस्थितीत ठाणापुडे (ता. वाळवा, जि. सांगली) येथे भावाच्या लग्नात ‘गारवा’ म्हणून निपाणी व कागलमधील बहिणींनी आंब्याची २०० रोपे महिलांना देऊन पर्यावरण संरक्षणाला हातभार लावण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे.
विवाह, घर बांधकामासह शुभकार्याप्रसंगी बहिणींसह पाहुण्यांकडून गारवा नेण्याची परंपरा आहे. त्यानुसार विविध पदार्थ दुरडीतून नेले जातात. लग्नसमारंभात आजही वधू-वराच्या घरासमोर उभारलेल्या मंडपाला गारवा नेला जातो. यावेळी उखाणे घेऊन दुरड्या सोडून लग्नघरातील मंडळी त्याचा आस्वाद घेतात. येथील सद्गुरू मेडिकलचे मालक प्रबोधन ऊर्फ नवनाथ पाटील (मूळ गाव ठाणापुडे) यांचा विवाह बाळासाहेब पाटील (बाणगे, ता. कागल) यांची कन्या निकिता हिच्याशी कोल्हापूरजवळील पुलाची शिरोली येथे झाला. या विवाहापूर्वी निपाणीतील सद्गुरू हॉस्पिटलचे डॉ. उत्तम पाटील यांच्या पत्नी डॉ. प्रतिभा पाटील (गलगले, ता. कागल) व कागलमधील प्रणोती नितीन शिंदे (सॉफ्टवेअर इंजिनिअर, पुणे) या बहिणींनी गारव्याच्या रूपाने ठाणापुडेत महिलांना २०० आंब्याची रोपे देऊन वेगळा पायंडा पाडला.
हेही वाचा - बापरे! चक्क पोलीसाच्या घरात आढळला दारु साठा
लग्नकार्यात विविध विधींसाठी हमखास आंब्याच्या डहाळ्यांचा वापर होतो. त्यासाठी झाडाच्या फांद्या तोडल्या जातात. समारंभ पार पडला की आंब्याचे डहाळे व फांद्या पायदळीच तुडविल्या जातात. त्या पार्श्वभूमीवर संवेदना दाखवत डॉ. प्रतिभा पाटील व प्रणोती शिंदे यांनी हा आदर्शवत उपकम राबविला.
प्रबोधनच्या विवाहात ‘प्रबोधन’
ठाणापुडे येथील पाटील कुटुंबातील कन्यांनी आपला भाऊ प्रबोधन यांच्या विवाहात निसर्गाशी समरस होत आंबा रोपे गारवा म्हणून दिली. योगायोगाने प्रबोधन यांच्या विवाहात पर्यावरण संरक्षणाबाबत या उपक्रमातून ‘प्रबोधन’ झाल्याची चर्चा सुरू आहे.
"मानवाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे पर्यावरणाचे संतुलन ढासळत आहे. मात्र, पर्यावरण संरक्षणाचा ध्यास घेतल्यास प्रदूषण रोखण्यास निश्चित मदत होणार आहे. या कामी खारीचा वाटा म्हणून भावाच्या लग्नात गारवा म्हणून महिलांना आंबा रोपे दिली."
- डॉ. प्रतिभा पाटील, निपाणी
हेही वाचा - ‘विकोआ गोखलेई’ नव्या जागतिकस्तरीय फूल वनस्पतीचा शोध! -
संपादन - स्नेहल कदम