अबब ! साठ गावांमध्ये बीएसएनएल 'नॉटरिचेबल 

प्रमोद जेरे
रविवार, 8 डिसेंबर 2019

जिल्ह्यात सर्वाधिक नेटवर्क असणारी आणि गोरगरिबांना अत्यंत स्वस्तात सेवा देणाऱ्या बीएसएनएलच्या संपर्क यंत्रणेवर याचा प्रतिकूल परिणाम झाला आहे. याप्रश्नी जिल्ह्यातील संघटनांनी आवाज उठवणे नितांत गरजेचे बनले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून बीएसएनएलची निधीअभावी परवड सुरू आहे.

मिरज ( सांगली ) - भारत दूरसंचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या सरकारी कंपनीकडे वीजेचे बिल भरण्यास पैसे नसल्याने सांगली जिल्ह्यातील साठ गावांमध्ये बीएसएनएलची सेवा पूर्ण ठप्प झाली आहे. परिणामी येथील मोबाईल, दूरध्वनी, यासह बॅंकिग, एटीएम, आणि सर्व शासकीय कार्यालयातील यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाली आहे. याबाबत बीएसएनएलचे वरिष्ठ अधिकारी ही यंत्रणा पूर्ववत होण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असले तरी मुंबई आणि दिल्ली स्थित वरिष्ठ अधिकारी अधिकाऱ्यांसह केंद्र आणि राज्य सरकार याबाबत अतिशय निष्काळजी असल्याचे चित्र आहे. 

जिल्ह्यात सर्वाधिक नेटवर्क असणारी आणि गोरगरिबांना अत्यंत स्वस्तात सेवा देणाऱ्या बीएसएनएलच्या संपर्क यंत्रणेवर याचा प्रतिकूल परिणाम झाला आहे. याप्रश्नी जिल्ह्यातील संघटनांनी आवाज उठवणे नितांत गरजेचे बनले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून बीएसएनएलची निधीअभावी परवड सुरू आहे. केंद्र सरकार बीएसएनएलच्या मोबाईल आणि दूरध्वनी सेवेबाबत गंभीर नाही. एकेकाळी हजारो कोटी रुपयांचा नफा सरकारला मिळवून देणारी ही कंपनी सध्या आर्थिक आरिष्टाच्या फेऱ्यात सापडली आहे.त्यामुळे 92 हजार कर्मचाऱ्यांची कपात करून प्रशासकीय खर्च कमी करण्याचा प्रयत्न बीएसएनएलने केला.

कर्मचाऱ्यांचे पगारही रखडले

सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे पगारही दोन-दोन महिने मिळत नाहीत. ग्रामीण भागातील किरकोळ दुरुस्तीची कामेही अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदरचे पैसे घालून करावी लागत आहेत. बीएसएनएल ही खात्रीची सेवा देणारी सरकारी कंपनी म्हणून सर्वसामान्यांच्या पसंतीस उतरू लागली असतानाच या कंपनीस आर्थिक अडचणीत आणून तिच्या सेवेमध्ये अशा प्रकारे अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न काही खाजगी कंपन्या राजकीय हस्तकांकरवी करत आहेत. त्यामुळे सध्या बीएसएनएलकडे विज बिल भरण्यासाठीही पैसे नसल्याचे कारण सांगण्यात येत आहे. ग्रामीण भागातील अनेक एक्‍सचेंज भाड्याच्या जागेत असल्याने आणि या इमारतींची भाडी थकल्याने हे इमारत मालकही यांच्यामधील दुरुस्तीसाठी ही ही इमारतीमध्ये येऊ देत नाहीत. बीएसएनएलचे आर्थिक नियोजन मुंबईस्थित कार्यालयातून होत असल्याने तेथील अधिकाऱ्यांना ग्रामीण भागातील ग्राहकांच्या गैरसोयीबाबत गांभीर्य नसल्यानेच या साठ गावांमधील सेवा ठप्प आहे. 

बीएसएनएलच्या आर्थिक अडचणी बाबत गेल्या अनेक महिन्यांपासून माझ्याकडे तक्रारी येत आहेत. याबाबत मी स्वतः केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे त्यांना मी प्रत्यक्ष भेटणार आहे. बीएसएनएल ही सर्वसामान्यांना परवडणारी सेवा असल्याने मी स्वतः यामध्ये लक्ष घालणार आहे 

- सुरेश खाडे, आमदार

एकेकाळी सरकारला चाळीस हजार कोटी रुपयांचा वार्षिक नफा मिळवून देणारी सरकारी कंपनी नियोजनबद्ध पद्धतीने बंद करून ती एका मोठ्या भांडवलदाराच्या घशात घालण्याचा केंद्र सरकार मधील भांडवलदारधार्जिण्या नेत्यांचा प्रयत्न आहे. पण आम्ही तो यशस्वी होऊ देणार नाही त्याविरोधात आम्ही संघर्ष करू. 

 - प्रा शरद पाटील, माजी आमदार  

सेवा ठप्प असलेली गावे 

  • मिरज- सलगरे, मल्लेवाडी, आरग, बिसूर, लिंगनूर, समडोळी, एरंडोली, बेळंकी 
  • वाळवा- गोटखिंडी, ओझर्डे, येडेमच्छिंद्र, आष्टा, बागणी 
  • खानापूर- भाळवणी, आमणापुर, नेवरी, लेंगरे, घोटी, आळसंद 
  • तासगाव- तुपारी, किंदरवाडी, विजयनगर, विसापूर, शिरगाव, राजापूर, कुमठे, आळते, उपळावी, धुळगाव, आरवडे, पेड. 
  • शिराळा- कांदे, मिणी फाटा 
  • कडेगाव- वांगी 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BSNL Network Not Reachable In 60 Villages In Sangli