
मिरज तालुक्यातील भोसेच्या हद्दीत दंडोबा डोंगराला आग लागली. ऐंशी एकरातील गवत, हजारो झाडे जळून खाक झाली.
मिरज (जि. सांगली) : तालुक्यातील भोसेच्या हद्दीत दंडोबा डोंगराला आग लागली. ऐंशी एकरातील गवत, हजारो झाडे जळून खाक झाली. अभयारण्याशेजारील शेतकरी, ग्रामस्थ, पंचायत समिती सदस्य कृष्णदेव कांबळे यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. पाच-सहा तासांनंतर आग आटोक्यात आणण्यास थोडे यश आले. सायंकाळपर्यंत काही ठिकाणी धुराचे लोट दिसत होते.
अभयारण्यात शनिवारी सायंकाळी उशिरा आग लागली असावी, असा अंदाज आहे. 40 ते 50 एकरांहून अधिक क्षेत्र जळाल्यानंतर ग्रामस्थ, शेतकऱ्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तातडीने हिरवी झुडपे हातात घेऊन तिन्ही बाजूंनी आग विझवणे सुरू केले. आगीचा लोळ, अपुऱ्या मनुष्यबळामुळे आग विझवण्यात अडथळे आले.
आगीत 80 एकरांहून अधिक क्षेत्रातील गवत, मोठी झाडे जळून खाक झालीत. मोठी झाडे, तर हजारो मध्यम आकाराच्या झाडांचा त्यात समावेश आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना आग लागल्याचे उशिरा समजले. चार-दोन कर्मचारीच तेथे उपस्थित असल्याने त्यांनीही आग विझवण्याचा प्रयत्न केला.
आगीचे कारण अस्पष्ट
दंडोबा अभयारण्यातील उपद्रवींचा वावर अजून कमी झालेला नाही. ही आग नेमकी कशी लागली, याचा अंदाजही आलेला नाही. आगीत झालेले नुकसान पाहता दंडोबा अभयारण्याची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करणे गरजेचे आहे.
आगीची सखोल चौकशी झाली पाहिजे
दंडोबा डोंगराची कष्टपूर्वक, कोट्यवधी रुपये खर्चून जपणूक केलीआहे. वनसंपदा जपणे सर्वांचेच कर्तव्य आहे, परंतु सुरक्षाव्यवस्थेत त्रुटी आहेत. वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केले जाते. आजच्या आगीची सखोल चौकशी झाली पाहिजे.
- कृष्णदेव कांबळे, सदस्य, पंचायत समिती.
संपादन : युवराज यादव