esakal | इथे आता व्यवसायासाठी लागणार परवाना
sakal

बोलून बातमी शोधा

 Business license compusary in Sangali municipal area now

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रातील व्यावसायिकांना परवाने सक्तीचा करण्यात आला आहे.

इथे आता व्यवसायासाठी लागणार परवाना

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रातील व्यावसायिकांना परवाने सक्तीचा करण्यात आला आहे. व्यावसायिकांना सुलभरितीने परवाने देण्यासाठी आजपासून शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. परवाने नसलेल्या व्यावसायिकांचे व्यवसाय बंद करण्याचा इशारा महापालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.

महापालिका क्षेत्रातील व्यावसायिकांची महापालिकेकडे रितसर नोंद व्हावी आणि त्यांच्या व्यवसायासाठी परवाने देण्यात यावेत यासाठी 2 मार्च ते 11 मार्च या कालावधीत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाय यातून महापालिकेच्या तिजोरीतही भर पडणार आहे. शिबिरात ज्यांची कागदपत्रे आहेत त्यांना पडताळणी नंतर जाग्यावर किंवा पोस्टाने घरपोच परवाना देण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली. 

महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत सांगलीच्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे सकाळी 9:45 ते 6:15 या वेळेत सांगलीसाठी सोमवार 2 ते 4 मार्च या कालावधीत तर 5 आणि 6 मार्च रोजी मिरजेतील व्यावसायिकांसाठी मिरजेच्या महापालिका कार्यालय आणि 9 मार्च ते 11 मार्च या कालावधीत कुपवाड विभागीय कार्यालयात हे शिबिर होत आहे. 

यासाठी 100 रुपये फॉर्म फी आहे. व्यावसायिकांनी आवश्‍यक कागदपत्रांसह दिलेल्या तारखेला दिलेल्या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या व्यवसायाचा परवाना काढून घ्यावा. ज्यांनी शिबिरावेळी कागदपत्रांची पूर्तता केली असेल त्यांना जाग्यावर किंवा पोस्टाने घरपोच परवाने देण्यात येणार आहेत. असे आयुक्त कापडणीस यांनी सांगितले. 

परवाना नसल्यास व्यवसाय बंदची कारवाई 
मनपा क्षेत्रात विना परवाना सुरू असणाऱ्या व्यवसायाला परवाने देण्याची ही मोहीम हाती घेतली आहे. 11 मार्च ही अखेरची मुदत आहे. त्यानंतर ज्या व्यवसायाला परवाना नाही आणि ज्यांचा परवाना आहे मात्र तो नूतनीकरण केला नाही, मात्र तो व्यवसाय सुरू आहे असे निदर्शनास येईल त्याचा व्यवसाय बंद करण्याची कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे 11 मार्च पूर्वी व्यवसाय परवाने घ्या आणि ज्यांचे परवाने आहेत त्यांनी आपले नूतनीकरण करून घ्यावे, असे आवाहन आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे. 

व्यापारी विरोध करणार 
महापालिकेने व्यापारी संघटनेशी चर्चा न करता हा परवाना कर आणला आहे. त्यासाठी पाचशे रुपयांपासून 28 हजार रुपयांपर्यंत दर लावले आहेत. जिझिया कर लावून व्यापारी, व्यावसायिकांची लूट सुरू आहे. कोल्हापूरसारख्या महापालिकेतही एवढा प्रचंड कर नाही. शिवाय परवाने नसल्यास व्यवसाय बंद करण्याची धमकी देण्याचा प्रकार कुठला? असा सवाल व्यापारी अतुल शहा यांनी केला. ते म्हणाले,""महापालिकेचा हा जिझिया कर आहे. तो व्यापारी भरण्यास तयार नाहीत. या कराला व्यापारी विरोध करण्याच्या तयारीत आहेत. दोन दिवसात याबाबत बैठक घेऊन निर्णय होईल असे ते म्हणाले.'' 

पाच व्यवसायांना जाग्यावर परवाना 
व्यवसायधारकांना तात्काळ व्यवसाय परवाना देण्यासाठी सुरू केलेल्या शिबिरात पहिल्याच दिवशी पाच व्यवसायधारकांना परवाने शिबिराच्या ठिकाणीच देण्यात आले. दिवसभरात 33 व्यवसायधारकांनी आपले अर्ज शिबिरामध्ये जमा केले. पहिल्या दिवशी अर्ज 344 नेले. त्यातील 33 फाईल जमा केल्या. पाच नवीन परवाने दिले. 28 फाईल्स स्थळ पाहणीसाठी पाठवल्या. फॉर्म फी, नूतनीकरण, नवीन परवाने यामधून एकूण रक्कम 1,11,400 रुपये जमा झाले.  

loading image