
हुपरी : येथील एका चांदी व्यावसायिकाने विटा (जि. सांगली) येथील एका व्यापाऱ्यास कमी शुद्धतेच्या चांदीच्या पाटल्या (विटा) देऊन त्याबदल्यात चांदी माल घेऊन सुमारे पस्तीस लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार उघड झाला. हे फसवणूक प्रकरण विटा पोलिस ठाण्यापर्यंत गेले; पण संबंधित व्यापारी व फसवणूक करणारा व्यावसायिक यांच्यात व्यापारी संघटनेने केलेल्या मध्यस्थीनंतर या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला. मात्र, या प्रकरणातील चांदी मालासंबंधीची कागदपत्रे व पावत्या तसेच फसवणूक करणाऱ्याचे फोटो आज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.