गाळ्यासाठी ई लिलावावर महापालिका आयुक्त ठाम; व्यापाऱ्यांची सोलापूर बंदची हाक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

पालिकेच्या मेजर व मिनी गाळ्यांच्या भाड्याबाबत महापालिका सभेने केलेला ठराव फेटाळून लावत, बाजारभावानेच भाडे घ्यावे, असा आदेश नगरविकास विभागाने महापालिकेस दिला होता. 

सोलापूर : गाळ्याच्या ई लिलावावर आयुक्त ठाम राहिल्याने व्यापाऱ्यांनी गुरुवारी (ता. १२) सोलापूर बंदची हाक दिली आहे. महापालिका मेजर व मिनी गाळे संघर्ष समितीच्या वतीने गाळे ई लिलावाच्या विरोधात पालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

पालिकेच्या मेजर व मिनी गाळ्यांच्या भाड्याबाबत महापालिका सभेने केलेला ठराव फेटाळून लावत, बाजारभावानेच भाडे घ्यावे, असा आदेश नगरविकास विभागाने महापालिकेस दिला होता. यामुळे रेडीरेकरन दराने किंवा ई-लिलाव पद्धतीने १३८६ गाळ्यांचा लिलाव होणार आहे. गाळेधारक व्यापाऱ्यांनी त्या विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले असून सत्ताधारी भाजपा वगळता इतर सर्व पक्षीयांनी त्यास पाठिंबा दिला आहे.

दरम्यान गुरुवारी सोलापूर महानगरपालिका मेजर व मिनी गाळे धारक व्यापारी संघर्ष समितीच्या वतीने गाळ्यांची ई टेंडर निविदा प्रक्रिया रद्द करण्याच्या मागणीसाठी पालिका प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी पालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या 

यासंदर्भात पालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांना शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले गाळेधारक व्यापारी व त्यांचे सात हजार कुटुंबीय यावर अवलंबुन आहेत. उत्पन्नाचे साधन बंद होऊन रोजीरोटीचा प्रश्न गंभीर होणार आहे. ई टेंडर निविदा प्रक्रियेमुळे प्रस्तापित गाळेधारक विस्थापित होऊन त्यांच्यावर अन्याय होणार आहे. व्यापाऱ्यांनी बँकेचे कर्ज घेतले आहे. व्यवसाय अडचणीत आल्याने कर्ज फेडता येणे शक्य नाही. परिणामी संबधित बँका सुध्दा अडचणीत येतील तेव्हा ई टेंडर पध्दती न राबविता त्याच गाळे धारकांना योग्य भाडे वाढ करून नूतनीकरण आणि हस्तांतरण करून देण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

या आंदोलनात माकपचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर नवी पेठ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक मुळीक, चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रभाकर वनकुद्रे, विजय पुकाळे, केतन शहा, अमरीश आयनापुरे, माजी महापौर मनोहर सपाटे, बसपाचे गटनेते नगरसेवक आनंद चंदनशिवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष भारत जाधव, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते नगरसेवक किसन जाधव, नगरसेवक विनोद भोसले, गणेश पुजारी, अमोल शिंदे, विजय भोईटे यांच्यासह व्यापारी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते 

पालिका आयुक्तांनशी दीड तास चर्चा केली मात्र ते ई टेंडर पध्दतीवर ठाम आहेत मात्र यामुळे व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे अखेर सोमवारी 9 जुलै रोजी महापालिकेवर व्यापारी व त्यांच्या कुटुंबियांसह विराट असा मोर्चा महापालिकेवर काढण्यात येणार असल्याचा इशारा माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिला आहे.

गाळ्यासंदर्भातले शासन परिपत्रक स्थगित करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. पालिका आयुक्त आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने टप्याटप्याने आंदोलन करण्यात येत आहे, अशी माहिती नवी पेठ व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक मुळीक यांनी दिली.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Call of traders for Solapur Bandi