शिंगणापुरात होणार "लटकू हटाव' मोहीम 

A campaign of action in Shinganpur
A campaign of action in Shinganpur

सोनई : शनिशिंगणापूर गावाचे नाव राज्य व देशात खराब होण्यास कारणीभूत असणारे "लटकू' (पूजासाहित्य एजंट) एक जानेवारी 2020पासून बंद करून विश्वस्त मंडळ शनिभक्तांना नव्या वर्षाची भेट देणार आहे. याबाबत शनिवारच्या (ता. 14) बैठकीत तसा निर्णय झाल्याची माहिती विश्वस्तांनी दिली. 

अनेक वर्षांपासून गावात तीनशेहून अधिक, तर राहुरी आणि घोडेगाव रस्त्यांवर व्यावसायिकांचे दोनशेहून अधिक "लटकू' वाहनांचा पाठलाग करून व गावात वाहने अडवून शनिभक्तांना महागडे पूजासाहित्य घेण्यास सक्ती करीत आहेत. भाविकांना दमदाटी, शिवीगाळ, फसवणूक व प्रसंगी मारहाण करण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. हाच प्रकार देवस्थानाचे नाव खराब होण्यास कारणीभूत ठरत आहे. अलीकडच्या दोन-तीन वर्षांत दर्शनासाठी गर्दी कमी होत असल्याचे बोलले जात आहे. 

"लटकू'मुक्त गाव होणार 
यशवंत सामाजिक प्रतिष्ठानाचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी विश्वस्त मंडळासह प्रथम शनैश्वर देवस्थान अधिकारी, विविध विभाग अधिकारी, सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या बैठका घेऊन, सर्व वाहनतळमालक व व्यावसायिकांची बैठक घेऊन भाविकांना समाधानाचे दर्शन मिळण्यासाठी वाईट प्रकार बंद करण्याच्या सूचना केल्या. एक जानेवारी 2020पासून "लटकू'मुक्त गाव करून भक्तांना नव्या वर्षाची भेट दिली जाणार असल्याचे त्यांनी बैठकीत ठणकावून सांगितल्याचे स्थानिकांनी सांगितले. 

"लटकूं'चे धाबे दणाणले 
बैठकीतील विषयाची चर्चा काही वेळेतच परिसरात झाल्यानंतर ग्रामस्थ व भाविकांतून या निर्णयाचे स्वागत सुरू झाले आहे. अनेक व्यावसायिकांच्या व्यवसायात "लखलाभ' ठरणाऱ्या "लटकूं'चे धाबे चांगलेच दणाणले आहे. यामुळे होणारी व्यावसायिक स्पर्धा बंद होऊन नेहमी होणारे वाद होणार नाहीत. येथे जास्त प्रमाणात बाहेरगावचेच व्यावसायिक असल्याने, त्यांना रोजचाच व्यवसाय महत्त्वाचा आहे. गाव व देवस्थानाचे घेणे-देणे नाही, असे ग्रामस्थांतून बोलले जाते. 

पोलिस ठाणे शोभेची वस्तू 
माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी पाच वर्षांपूर्वी येथील पोलिस ठाण्याचे उद्‌घाटन करून जाहीर भाषणात, येथील "लटकू' आता कायमचेच हद्दपार होतील, असे सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात तसे काहीही न होता त्यांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. अनेक वर्षांपासून पोलिस ठाण्यासमोरच "लटकूं'चा वाहने अडविण्याचा मुख्य अड्डा आहे. मात्र, कारवाई होत नाही. 

"लटकूं'च्या त्रासाची साडेसाती 
साडेसाती निवारणाची देवता म्हणून येथे येतो; मात्र येथे तर "लटकूं'च्या त्रासाची साडेसाती सहन करावी लागते. ट्रस्टने खरोखरच धाडसी निर्णय राबविला, तर शनिदेवाची महती अधिकच वाढेल. 
- प्रवीण पटेल, भाविक, बडोदा 

निर्णय व्यावसायिक हिताचा 
प्रशांत गडाख यांच्या संकल्पनेतील निर्णय नक्कीच गावाच्या हिताचा आहे. आज "लटकू'बंदचा निर्णय कडू वाटत असला, तरी येथे भाविकांचा ओढा असणेही महत्त्वाचे आहे. हा निर्णय गावाबरोबरच व्यावसायिक हिताचा आहे. 
- विकास बानकर, वाहनतळ मालक, शनिशिंगणापूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com