शहरात मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम अखेर सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Campaign to catch stray animals started In Sangli city

बेळगाव : शहरात मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम अखेर सुरू

बेळगाव - शहरातील मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम अखेर महापालिकेने सुरू केली आहे. मंगळवारी (ता. १९) महापालिकेच्या पशुसंगोपन व अतिक्रमण निर्मूलन विभागाने मिळून सात मोकाट जनावरे पकडली. सर्वाधिक म्हणजे पाच मोकाट जनावरे नरगुंदकर भावे चौकात पकडण्यात आली आहेत. मुजावर गल्लीच्या कोपऱ्यावर दोन जनावरे पकडण्यात आली. ही सातही जनावरे श्रीनगर येथील महापालिकेच्या गोशाळेत पाठविण्यात आली आहेत. महापालिकेकडून शहरातील मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम मंगळवारी (ता. १९) सुरू होणार असल्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते, ते वृत्त खरे ठरले आहे. शिवाय या मोहिमेमुळे आता शहरातील मोकाट जनावरांची संख्या व समस्याही कमी होईल अशी अपेक्षा आहे. मंगळवारच्या या मोहिमेत पालिकेच्या आरोग्य विभागानेही सहकार्य केले.

बेळगाव महापालिकेने गेल्या साडेचार महिन्यांपासून मोकाट जनावरांविरोधात मोहीम राबविली नव्हती. गेल्या आठवड्यात पालिकेने मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीची मोहीम सुरू केली, पण जनावरांकडे दुर्लक्ष केले होते. शहरातील मोकाट कुत्री, जनावरे व डुकरे यांच्यासाठी चार पथकांची स्थापना करण्याची निर्णय महापालिकेने घेतला आहे. शहराच्या उत्तर विभागासाठी व दक्षिण विभागासाठी प्रत्येकी दोन पथके तैनात केली जाणार आहेत.

मात्र, त्या पथकांची अद्याप स्थापना झालेली नाही. शिवाय अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या वाहनाची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे मोकाट जनावरे पकडण्यास सुरूवात केली नव्हती. पण या जनावरांमुळे नागरिकांना होत असलेला त्रास, जनावरांकडून शहरातील बस थांब्यांमध्ये झालेले अतिक्रमण, वाहतुकीला होत असलेला अडथळा यामुळे त्यांना पकडण्याची मोहीम सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला व त्याची कार्यवाही सुरू झालेली आहे.

मोहीम नियमितपणे राबविण्याची गरज

श्रीनगर येथील महापालिकेच्या मालकीच्या जागेत गोशाळा बांधण्यात आली आहे. स्मार्ट सिटी योजनेच्या निधीतून ते बांधकाम करण्यात आले आहे. एकावेळी ५० हून अधिक जनावरे तेथे ठेवता येणे शक्य आहे. एका खासगी संस्थेकडे त्या गोशाळेची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे मोकाट जनावरे ठेवण्याची समस्या आता महापालिकेला नाही, केवळ त्यांना पकडण्याची मोहीम नियमितपणे राबविणे आवश्‍यक आहे.

Web Title: Campaign To Catch Stray Animals Started In Belgaum City

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top