esakal | पुराच्या वेळी छतावर नेलेली जनावरे कशी आणली खाली? (व्हिडिओ)
sakal

बोलून बातमी शोधा

Cattels dropped down by crane in Shirol

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात बस्तवाड येथे तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या जनावरांना क्रेनच्या सहाय्याने खाली उतरविण्यात आले. तर, बहुतेक जनावरांना तिसऱ्या मजल्यावरून खाली आणताना त्यांचे पाय घसरू नयेत म्हणून शेतकऱ्यांनी कपडे, गाद्या टाकल्या होत्या.

पुराच्या वेळी छतावर नेलेली जनावरे कशी आणली खाली? (व्हिडिओ)

sakal_logo
By
संजय खूळ

इचलकरंजी : महापुराच्या काळात माणसे होडीत बसून सुरक्षित ठिकाणी गेली. पण, जनावरांना होडीत नेणे शक्य नव्हते. म्हणून त्यांना जिन्याने घराच्या छातावर चढविण्यात आले. आता पूर ओसरल्यावर जनावरांना खाली आणणे क्रमप्राप्त होते. पण, पायऱ्यांनी खाली उतरणे वजनाने जड असणाऱ्या जनावरांना धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे जिन्याच्या पायऱ्यांवर गाद्या टाकून हळू हळू जनावरांना खाली उतरविण्यात आले. जिथे हेही शक्य झाले नाही, तिथे क्रेनच्या सहाय्याने जनावरांना छतावरून खाली उतरविण्यात आले.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात बस्तवाड येथे तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या जनावरांना क्रेनच्या सहाय्याने खाली उतरविण्यात आले. तर, बहुतेक जनावरांना तिसऱ्या मजल्यावरून खाली आणताना त्यांचे पाय घसरू नयेत म्हणून शेतकऱ्यांनी कपडे, गाद्या टाकल्या होत्या.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ हा तालुका समृद्ध तालुका म्हणून ओळखला जातो. शेती हाच मुख्य व्यवसाय असलेल्या या तालुक्यात दुग्धोत्पादन ही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येक गावात जनावरांची संख्या मोठी आहे. तालुक्यातील तब्बल 41 गावांना पुराचा तडाखा बसला तर 26 हून अधिक गावांना बेटाचे स्वरूप आले होते. बेटाचे स्वरूप आलेल्या गावातून नागरिक बाहेर पडले मात्र, जनावरांना बाहेर काढणे अत्यंत अवघड होते. त्यामुळे अनेक तरुण आणि शेतकरी चहूबाजूने पाणी असतानाही या जनावरांच्या देखभालीसाठी गावातच राहिले. गावात इंचभरही जागा शिल्लक नसल्याने काही ठिकाणी ही जनावरे इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर बांधण्यात आली. या ठिकाणी या जनावरांचे पालन पोषण करण्यात येत होते.

पूर ओसरल्यानंतर इमारतीवर असणारी जनावरे खाली आणणे एक मोठे आव्हान होते. जनावरे पायऱ्या सहजपणे चढत होते मात्र, उतरताना त्यांचा तोल तोंडाच्या बाजूला अधिक पडत असल्याने जनावरांना मोठी इजा होण्याची शक्यता होती. त्यामुळे प्रत्येक जनावराला साडीने अथवा कापडाने बांधून पाच ते सहा शेतकरी या जनावरांना पायरीवरून खाली आणत होते.
हे करत असताना पायरीवरील फरशीचा अथवा काँक्रीटचा त्रास जनावरांना होऊ नये यासाठी चक्क कपडे आणि गाद्या टाकण्यात आल्या. त्यावरून या जनावरांना हळुवारपणे खाली आणण्यात आले. शिरोळ तालुक्यातील बस्तवाड या गावात क्रेनच्या सहाय्याने जनावरे खाली आणण्यात आली. याठिकाणी पायरीवरून जनावरे आणणे अत्यंत जोखमीचे असल्याने शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला.
 

loading image
go to top