esakal | "कोरोना'वर हाच एकमेव उपाय  
sakal

बोलून बातमी शोधा

Caution is the solution to Corona

दिल्लीपाठोपाठ बंगळूर व पुण्यातही कोरोनाग्रस्त आढळल्याने धोका वाढला आहे. अद्याप प्रतिबंधात्मक औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने या आजाराचा फैलाव वेगाने होत आहे. त्यामुळे, खबरदारी हाच त्यावरील उपाय ठरत आहे.

"कोरोना'वर हाच एकमेव उपाय  

sakal_logo
By
विनायक जाधव

चीनसह काही देशांमध्ये हाहाकार माजविणाऱ्या कोरोना विषाणूने (कोवीड-19) आता भारतातही प्रवेश केला आहे. देशभरात आतापर्यंत 28 रुग्ण आढळल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. सर्वप्रथम केरळमध्ये तीन रुग्ण आढळले होते. आता दिल्लीपाठोपाठ बंगळूर व पुण्यातही कोरोनाग्रस्त आढळल्याने धोका वाढला आहे. अद्याप प्रतिबंधात्मक औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने या आजाराचा फैलाव वेगाने होत आहे. त्यामुळे, खबरदारी हाच त्यावरील उपाय ठरत आहे. सर्वसामान्यांमध्ये कोरोनाची दहशत पसरली आहे. या पार्श्‍वभूमीवर कोरोनाबद्दल जाणून घेण्याचा हा प्रयत्न..... 

कोविड-19 म्हणजे काय? 
कोविड हा कोरोनाव्हायरस म्हणूनही ओळखला जातो. तो विविध प्रकारच्या विषाणूंचा एक मोठा समूह आहे. प्राणी व मानवात त्याचा प्रसार होऊ शकतो. कोरोना विषाणूंमुळे सामान्य सर्दीपासून गंभीर स्वरुपाचा श्‍वसनाचा आजारही होऊ शकतो. जो मृत्यूस कारणीभूत ठरतो. चीनमध्ये सापडलेल्या नव्या कोरोना विषाणूमुळे श्‍वसनाच्या आजारात झपाट्याने वाढ होत आहे. त्याला "कोवीड-19' असेही म्हटले जाते. कोरोना हा विषाणू असून तो सामान्यता प्राण्यांमध्ये आढळतो. क्वचितप्रसंगी मानवाला त्याची लागण होते. पण, त्यानंतर संसर्गाने तो इतरांमध्येही पसरु शकतो. उदाहरणार्थ "सार्स-कोव्ह' रानमांजराशी संबंधित होता. तर "एमईआरएस-कोव्ही ड्रॉमेडरी' हा विषाणू उंटांद्वारे प्रसारित झाला. "स्वाईन फ्लू' डुकरांच्या संपर्कात आल्याने मानवाला झाला. त्यामुळे, थेट जनावरांच्या बाजारात जाताना किंवा दूध, कच्चे मांस यांचा वापर करताना काळजी घेणे आवश्‍यक आहे. कच्चे किंवा अर्धवट शिजवलेले मांस खाणे टाळावे. कोवीड विषाणू वातावरणात किती काळ टिकू शकतो हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वातावरण, भौगोलिक स्थिती, तापमान यावर हा विषाणू काही तास ते अनेक दिवस टिकू शकतो, असे दिसून आले आहे. 

प्रतिबंधात्मक औषधे नाहीत.... 
कोरोना विषाणूंचे संक्रमण झालेल्यांना कोवीडचे रुग्ण म्हणून संबोधले जाते. या आजारावर ऍन्टिबायोटीक (प्रतिजैविक) औषधांचा उपयोग होत नाही. कारण प्रतिजैविक औषधे ही जीवाणूंवर कार्य करतात. तर कोरोना हा विषाणू असल्याने प्रतिजैविकांचा त्यावर कोणताच प्रभाव पडत नाही. तसेच आयुर्वेदीक उपचाराचाही अद्याप प्रभाव पडल्याचे दिसून आलेले नाही. त्यामुळे, केवळ खबरदारी हाच उपाय ठरला आहे. 

संसर्ग कसा? 
सर्दी, खोकला, ताप, श्‍वसनाचा त्रास ही या रोगाची प्राथमिक लक्षण आहेत. त्यामुळे, अशा व्यक्तीपासून दूर राहा. एखादी व्यक्ती शिंकत वा खोकत असल्याने किमान दोन मीटरचे अंतर ठेवा. आजारी व्यक्‍तीशी हस्तांदोलन टाळा. खोकताना किंवा शिंकताना अशा व्यक्तींचे हात नाकातोंडाजवळ जातात. त्यामुळे, कोरोनाचे विषाणू त्याच्या हातावरुन तुमच्याही हातावर पसरु शकतात. असे हात आपल्या नाक, तोंड, डोळ्याजवळ गेल्यानंतर तसेच कातडीला स्पर्श केल्यानंतर देखील आपल्यात शिरकाव करतात. तसेच आजारी माणसाने स्पर्श केलेल्या वस्तूशी संपर्क आल्यास दुसऱ्या व्यक्‍तीलाही त्याची लागण होऊ शकते. 

अशी घ्यावी खबरदारी 
- सर्दी, खोकला, ताप, श्‍वसनाचा त्रास असलेल्या व्यक्तीपासून दूर राहा. 
- एखादी व्यक्ती शिंकत वा खोकत असल्याने किमान दोन मीटरचे अंतर ठेवा. 
- आजारी व्यक्‍तीशी हस्तांदोलन टाळा. 
- गर्दीच्या ठिकाणी किंवा जनावरांच्या बाजारात जाताना मास्कचा वापर करा. 
- शक्‍यतो धूळ आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. 
- गर्दीच्या ठिकाणी गेल्यास वेळोवेळी हात धुवावेत. 
- हात साबण, अल्कोहोल, हॅण्डवॉश, सॅनिटायझरने धुवावेत. किमान 20 सेकंद आपले हात, तळहात, सर्व बोटे चोळावीत. 
 
भारतात आढळलेले रुग्ण 
केरळ     3 
दिल्ली    1 
बंगळूर   1 
जयपूर  16 

"बंगळुरात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने राज्या हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यातील आरोग्यसेवाही सज्ज ठेवण्यात आली आहे. विमानतळासह मोक्‍याच्या ठिकाणी लक्ष ठेवण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयात यासाठी स्वतंत्र कक्ष आठ दिवसापूर्वीच तयार करण्यात आला आहे. बेळगावात संशयित रुग्ण आढळून आलेले नसले तरी आवश्‍यक ती खबरदारी घेण्यात आली आहे. यासाठी आरोग्य खाते दक्ष आहे.' 
- डॉ. अप्पासाहेब नरट्टी, जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण अधिकारी