शंभरी पार लक्ष्मीबाईंच्या हस्ते सांगलीत पुलाचा वाढदिवस 

धोंडिराम पाटील
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

मुलीच्या मुलीची मुलगी म्हणजे परतवंड असलेल्या श्रीमती मिनाक्षी मल्लाप्पा पुजारी यांच्याकडे त्या विजयनगरला राहतात. जमखंडी माहेर. तर कागवाड सासर. आयर्विन पुलाची उभारणी झाली सन 1929-30 दरम्यान. पुलाच्या उभारणीवेळचं सारं चित्रच पुढ्यात मांडतात. उद्या (ता. 18) त्यांच्या हस्ते पुलाचा वाढदिवस केला जाणार आहे. 

सांगली - सुककुतलेला चेहरा. वयाची शंभरी पार केलेल्या चेहऱ्यावर खुणा स्पष्ट. नजर थोडी अंधूक. पण, स्मरण शक्ती तीव्र. जे आणि जसं घडलं ते सारं कसं लख्ख आठवतं. त्यांचं नाव श्रीमती लक्ष्मी कामण्णा पुजारी. कृष्णा नदीवरील "आयर्विन' पुलाच्या निर्मितीवेळच्या एक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार. जसा आयर्विन भक्कम तशाच त्याही. 

मुलीच्या मुलीची मुलगी म्हणजे परतवंड असलेल्या श्रीमती मिनाक्षी मल्लाप्पा पुजारी यांच्याकडे त्या विजयनगरला राहतात. जमखंडी माहेर. तर कागवाड सासर. आयर्विन पुलाची उभारणी झाली सन 1929-30 दरम्यान. पुलाच्या उभारणीवेळचं सारं चित्रच पुढ्यात मांडतात. उद्या (ता. 18) त्यांच्या हस्ते पुलाचा वाढदिवस केला जाणार आहे. 

गड्याला 75, बायांना 50 पैसे मजुरी होती

त्या सांगत होत्या,""त्यावेळी मी दहा वर्षाची असेन. प्रचंड दुष्काळ पडला होता. विजापूर, अथणी भागात खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, अशी स्थिती. काम कुठुन मिळणार. त्याचवेळी सांगलीत पुलाचे काम सुरू होणार असे कळल्याने घरचे कामाच्या शोधात इकडे आले. नात्यातील सारी बाया-माणसं कामासाठी आलेले. दुष्काळामुळं गडी, माणसं सारीच इकडे आलेले. त्यात आई, वडील, चुलता चुलती, आत्या यांच्यासह बहिणी, बहिणीच्या जावा असे सारे होते. गड्याला 75, बायांना 50 पैसे मजुरी मिळायची.'' 

दगड आणण्यासाठी बैलगाडी वापर
त्या म्हणाल्या,""पुलाच्या खांबांसाठी वापरलेले दगड आणण्यासाठी बैलगाडी वापरली जायची. सांगलीवाडी, सांगली अशी दोन्ही बाजूने काम सुरू झालेलं. सांगलीवाडीच्या बाजूने दोन खांब उभे राहिले. अलीकडे गणपती मंदिराच्या बाजूला एकेका खांबाचं काम सरू होतं. काम सारखं ढासळायचं. उभंच राहयचं नाही. बांधकाम टिकत नव्हतं. पुण्या मुंबईचे लोक आले. काय केलं काय माहित, पण काम उभं राहु लागलं. लोकांत मात्र भितीचं वातावरण होतं.'' 

कुटुंबांत एकटा दीरच शिकलेला बाकी सारी अडाणी

लक्ष्मीबाई सांगत होत्या,""मला पाच मुलं. दोन मुली, तीन मुलं. आता कोणीच नाही. काही नातवंडंपण सोडून गेली. आता आहेत ती परतवंडं आणि खापर परतवंडं. नर्सरी, हळद कारखान्यात अनेक वर्षे काम केलं. मालगावला काही वर्षे पाच-सहा एकर शेतांत राबलो. पानमळा, ऊस, आठ बैलं, तीस पस्तीस जनावरं होती. दहा जणांचं कुटुंब. कुटुंबांत एकटा दीरच पाचवीपर्यंत शिकलेला होता. बाकी सारी अडाणी. पण, माझा मालक कष्टाला भारी. दुधा तुपाचा बेमाप वापर जेवणात असायचा. शुद्ध शाकाहार आणि कष्टामुळे एवढं आयुष्य मिळालं. देवाचीच कृपा. पण, माझ्यापेक्षा लहान सारी निघून गेली याचं वाईट वाटतं.''  

महिन्यापूर्वी निवृत्ती 

पणती श्रीमती मिनाक्षी यांनी सांगितलं, की लक्ष्मीबाई माझी पणजी. महिन्याभरापूर्वीपर्यंत काम करीत होत्या. मालू कुटुंबाकडे तसेच डॉ. रविंद्र व्होरा यांच्या नर्सरीत अनेक वर्षे त्यांचा राबता होता. शेती, धुणी, भांडी यासह पडेल ते काम त्या करीत. ती कष्टाची सवय आजही आहे. कष्ट आणि साधा व शाकाहारी आहार हेच त्यांच्या दीर्घायुष्याचं रहस्य असावं.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Celebrating Aniversiry Of Bridge In Sangli By 100 Years Old Women