केंद्र अद्ययावत; मात्र २४ पदांचा भार १२ कर्मचाऱ्यांवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 वनौषधीचे केंद्र

केंद्र अद्ययावत; मात्र २४ पदांचा भार १२ कर्मचाऱ्यांवर

मांगले : येथील जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र वनौषधीचे केंद्र म्हणून परिचित आहे. ‘स्मार्ट पीएचसी’ म्हणूनही सध्या हे केंद्र नावारुपाला येणार आहे. त्यादृष्टीने शासनाने खर्च करण्यास सुरवात केली आहे. मात्र अद्ययावत असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात २४ कर्मचाऱ्यांचे काम सध्या १२ कर्मचारीच करीत आहेत.

सुमारे दीड एकर प्रशस्त जागेत सर्व सोयींनीयुक्त प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. नरेंद्र घड्याळे व डॉ. जयसिंगराव पवार रुग्णांना चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आरोग्य केंद्रांतर्गत मांगलेसह कांदे, इंगरूळ येथे उपकेंद्रे आहेत. २३ हजार नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या या आरोग्य केंद्रात मंजूर २४ पदांपैकी १२ कर्मचारी कार्यरत आहेत; तर १२ कर्मचाऱ्यांची पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. दोन वैद्यकीय अधिकारी, एक महिला, एक आरोग्यसेविका, दोन आरोग्यसेवक, एक कनिष्ठ सहायक, चार परिचर, एक वाहन चालक असे कर्मचारी सेवा देत आहेत. दोन आरोग्य सहायक पुरुष, पाच आरोग्य सेविका, तीन आरोग्य सेवक पुरुष, एक फार्मासिस्ट, एक परिचर अशा बारा जागा रिक्त आहेत.

या केंद्रात फार्मासिस्ट पद गेल्या कित्येक वर्षांपासून रिक्त आहे. आरोग्य केंद्राविषयी ग्रामस्थांच्या मनात आदराची भावना आहे. अनेक ग्रामस्थांनी वैद्यकीय साहित्य, फर्निचर स्वरुपात मदत केली आहे. रुग्णालयातील अंतर्गत सर्व विभाग कार्यान्वित असून, स्वतंत्र प्रसूती कक्ष, स्वच्छतागृह, कर्मचारी निवासस्थाने आधुनिक करण्यात आली आहेत. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमामध्ये आरोग्य केंद्र अग्रेसर होऊन काम करीत आहे.

आरोग्य केंद्रांतर्गत स्वच्छतेबरोबरच परिसराची नेटकी स्वच्छता ठेवली जाते. कोरोना कालावधीत आरोग्यदूत बनलेल्या आरोग्य केंद्राचे काम वाखाणण्याजोगे होते. कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे आहे त्या कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागली. जिल्हा नियोजन मंडळातून ३१ लाख रुपये खर्चाची संरक्षक भिंत व निवासस्थानांची दुरुस्ती केल्यामुळे कर्मचाऱ्यांना काम करताना आणखी उत्साह वाटत आहे.

शिराळा तालुक्यात प्रशस्त जागा आणी इमारत असणारे मांगलेचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. ग्रामस्थांचा विविध उपक्रमात नेहमी सहभाग असतो. पदे रिक्त असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्यावर ताण येत असला, तरी समन्वय ठेवून रुग्णांना चागल्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे

- डॉ. नरेंद्र घड्याळे, आरोग्याधिकारी

Web Title: Center Updated Burden 24 Posts 12 Employees

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top