जयंतरावांसमोर आव्हान छुप्या नाराजांचेच

जयंतरावांसमोर आव्हान छुप्या नाराजांचेच

जिल्हा परिषदेच्या ११ आणि पंचायत समितीच्या २२ जागांसाठी वाळवा तालुक्‍यात सध्या धूमशान सुरू आहे. मित्र आणि विरोधकांचे नेमके चित्र स्पष्ट आहे. गेल्या २५ वर्षांच्या राजकारणात जयंत पाटील यांच्यासमोर या वेळी प्रथमच जबरदस्त आव्हान निर्माण करण्यात विरोधकांना यश आले आहे. इस्लामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीतील यशाने विरोधकांच्या अंगावर वीतभर मांस चढले आहे, तर तिथल्या पराभवाने जयंत पाटील ताकही फुंकून पित आहेत. आजघडीला जयंतरावांच्या गोटातून मातब्बर कोणीही बाहेर पडलेले नाही; मात्र नेहमीप्रमाणेच छुप्या नाराजांची संख्या सर्वत्र आहे. त्यांना हाताशी धरण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न आहेत. ते अधिक नेटाने सुरू आहेत. जयंतरावांनी आजवर नाराजांची ही फौज कसबाने हाताळली आहे... पण आता...? 

शिराळा विधानसभा मतदारसंघात वाळवा तालुक्‍यातील ४८ गावांचा म्हणजे सहा जिल्हा परिषद मतदारसंघांचा समावेश आहे. शिवाजीराव नाईक आणि जयंत पाटील यांच्यातील राजकीय सामना त्यामुळेच नेहमी चर्चेचा राहिला आहे. शिवाजीरावांनी जयंत विरोधकांची मोट बांधण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. खासदार राजू शेट्टी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, नानासाहेब महाडिक, वैभव नायकवडी अशी नेत्यांची फौजच जयंतरावांविरोधात पूर्वीही एकत्र होती. मात्र या वेळी त्यांनी रयत विकास आघाडीच्या नावाने एकच झेंडा घेतला आहे. एकाच व्यासपीठावर जमा झालेल्या नेत्यांनी या वेळी जयंतरावांचा ‘करेक्‍ट’ कार्यक्रम करायचा, या इराद्याने फासे टाकले आहेत.

नगरपालिका निवडणुकीत निशिकांत पाटील यांनी नगराध्यक्षपद जिंकले. राज्यातील सत्ताबदलानंतर सदाभाऊ खोत यांना मिळालेल्या मंत्रिपदाचे वातावरण याचा फायदा घेत विरोधकांनी जणू एल्गारच केला. थेट जनतेतून नगराध्यक्षपद निवडीची पद्धत सुरू करण्यामागे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तळागाळातील कार्यकर्त्यांच्या केडरला धक्का द्यायचाच इरादा होता. इस्लामपूर नगरपालिकेत विरोधकांना नगराध्यक्ष पद जिंकता आले, मात्र राष्ट्रवादीपेक्षा अधिक नगरसेवकांची संख्या मात्र होऊ शकली नाही. त्यामुळे हे यश निर्भेळ ठरले नाही. मात्र इस्लामपूरचा गड आपण उद्‌ध्वस्त करू शकतो, असा मोठा आत्मविश्‍वास मात्र मिळाला. त्यातूनच एरवी विरोधकांच्या एकजुटीच्या नाऱ्यांच्या तीन तऱ्हा व्हायच्या, त्या न होता किमान नऊ जिल्हा परिषद गटात विरोधकांना एकत्र येता आले. 

हुतात्मा उद्योग समूहाचे नेते वैभव नायकवडी यांनी आजवर बोरगाव, वाळवा, बावची या तीन गटांत क्रांती आघाडीच्या नावाने निवडणुका लढवल्या. त्यांच्यासमोर जयंत पाटील यांचेच आव्हान असे. खुद्द वाळव्यात गेल्या वेळी राष्ट्रवादीने मुसंडी मारली. त्यामुळे वैभव यांनी या वेळी सर्व विरोधकांची मोट बांधण्याच्या दृष्टीने तत्काळ सहमती दर्शवली. त्यांच्या या प्रयत्नाला बोरगाव वगळता सर्वत्र यश आले आहे. बोरगावमध्ये काँग्रेस चिन्हावरच लढण्याचा आग्रह जितेंद्र पाटील यांनी धरला. त्याच वेळी इथे क्रांती आघाडीने मिलिंद पाटील यांनाही उमेदवारी दिली. इथे राष्ट्रवादीने कार्तिक पाटील यांना उमेदवारी दिली आहे. चिकुर्डे गटात शिवसेनेच्या चिन्हावर अभिजित पाटील लढत आहेत. त्यांच्या विरोधात रयत आघाडीने शहाजी पाटील यांना, तर राष्ट्रवादीने राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांचे चिरंजीव संजीव पाटील यांना उमेदवारी दिली आहे. या दोन तिरंगी आणि काटा लढती असतील. इथे रयत आघाडीला एकमत करता आले नाही.  खुद्द सदाभाऊंनी बागणी गटात मुलगा सागर याच्या राजकीय कारकिर्दीची सुरवात करून दिली आहे. इथे माजी आमदार विलासराव शिंदे यांचे चिरंजीव वैभव व राष्ट्रवादीचे बंडखोर संभाजी कचरे यांच्या काटा लढतीत सागरला संधी मिळेल, असा त्यांचा होरा आहे. कुशल राजकीय व्यवस्थापक असलेल्या विलासरावांचे या भागात पै-पाहुण्यांचे आणि निष्ठावान कार्यकर्त्यांचे बळ आहे. इथे त्यांना आजवर जयंत निष्ठावानांचाच विरोध होता, तो आत्ताही असेल. कचरेंच्या मागे कोण कोण बळ उभे करतो हे पाहून प्रसंगी विलासराव शेजारच्या बावची गटात जयंतनिष्ठांच्या गमज्या करू शकतात. हुतात्मा गटानेही या वेळी बालेकिल्ला परत जिंकायचा, असा इरादा ठेवून मैदानात पाऊल टाकले आहे. कामेरीत छाया पाटील यांच्यासमोर अख्खा मसूर फेम एम. के. जाधव यांच्या पत्नी सुरेखा यांचे आव्हान असेल.  
पेठ व येलूर या दोन्ही गटात महाडिकांची हुकमत. शिक्षक नेते शि. द. पाटील यांनी रयत आघाडीत प्रवेश केल्याने महाडिकांच्या गोटात बेरीज वाढली आहे. शिवसेनेने इस्लामपूर नगरपालिकेत सवता सुभा मांडला होता. या निवडणुकीत त्यांनी चिकुर्डेतही अभिजित पाटील यांच्या रूपाने सवता सुभा मांडला आहे. भविष्यात शिवसेनेच्या जिल्हाभरात ज्या काही जागा येतील त्यात पासंगाची गरज पडलीच तर चिकुर्डेकर आपली भूमिका पक्की वठवतील. विरोधकांच्या या बेरजेमुळे जयंत पाटील यांचा गड उद्‌ध्वस्त होऊ शकतो का? हा सर्वात कळीचा सवाल असेल. मुळात जयंत पाटील यांची राजकीय ताकद टिपेला असतानाही विरोधकांकडे जिल्हा परिषदेच्या येलूर, पेठ आणि बोरगाव या तीन जागा होत्या. विरोधकांना यात भरीव वाढ करता आली तरच जयंतरावांचा पराभव केल्याचे समाधान मिळू शकते. याऊलट जयंतरावांना होमग्राऊंडवरच्या जागांची कधी नव्हे इतकी त्यांना जिल्ह्याच्या राजकारणासाठी गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुक्‍याच्या सध्याच्या संख्याबळात एखाद्या जागेची भरच टाकायची, असा त्यांचा स्पष्ट इरादा आहे. त्यासाठी गेल्या महिन्याभरात त्यांनी मोठी डागडुजी केली आहे. कोरेगावचे त्यांचे समर्थक कै. आर. के. पाटील यांचे नातू मयूर आणि येलूरमधील शि. द. पाटील गट यांनी केलेले पक्षांतर वगळता त्यांचे मोठे कार्यकर्ते थेट विरोधी गटात दाखल झाले आहेत, असे चित्र कुठेही नाही. मात्र गावागावातील त्यांचे नाराज कार्यकर्ते उट्टे काढायची ही सुवर्णसंधी म्हणून पाहू लागले आहेत. हाच जयंतरावांना सर्वात मोठा धोका आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com