RECRUITMENT : मराठवाडा, विदर्भ, खानदेशवासियांना या महापालिकेत नोकरीची लॅाटरी

विजयकुमार सोनवणे
मंगळवार, 21 जानेवारी 2020

सर्व परिक्षा एकाच वेळी घ्याव्यात 
वरिष्ठ पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराकडून शिपाई पदासाठीही अर्ज दाखल होऊ शकतात. त्यामुळे अल्पशिक्षित उमेदवारावर अन्याय होतो. त्यामुळे वरिष्ठ पद आणि शिपाई या दोन्ही पदासाठीच्या लेखी परिक्षा एकाचवेळी घ्याव्यात. 
- राजेश काळे, उपमहापौर
सोलापूर महापालिका 

 

सोलापूर : महापालिकेत सरळ सेवेद्वारे भरती करण्यात येणाऱ्या 32 जागांसाठी नांदेड, परभणी, धुळे, अकोला, हिंगोली येथून उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अनुसूचित जमाती प्रवर्गासाठीची ही विशेष भरती असून, अर्ज दाखल केलेल्यांकडे या प्रवर्गाचे जात वैधता प्रमाणपत्र आहे. सोमवारी सायंकाळअखेरपर्यंत 168 अर्ज दाखल झाले होते. त्यामध्ये स्थानिक उमेदवाराचा एकही अर्ज नसल्याचे सांगण्यात आले. 

हेही वाचा - खरचं... या महापालिकेत आंधळ दळतयं....

कायम नोकरीची लॅाटरी 
अनुसूचित जमाती प्रवर्गातील (एसटी) अधिसंख्य पदे भरण्यासाठी सोलापूर महापालिकेने इच्छुकांकडून अर्ज मागविले आहेत. एकूण 32 जागा भरण्यात येणार असून त्यामध्ये विविध श्रेणीतील पदांचा समावेश आहे. त्यासाठीची अर्ज विक्री गेल्या शुक्रवारपासून सुरू झाली आहे. 27 जानेवारीपर्यंत सायंकाळी पावणेसहापर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. या जागांसाठीची लेखी परीक्षा 9 फेब्रुवारी 2020 रोजी होणार आहे. आतापर्यंत अकोला, हिंगोली, नांदेड, परभणी, धुळे व जुन्नर येथील उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या सर्व अर्जांसोबत अनुसूचित जमातीचा वैध दाखला आहे. त्यामुळे या उमेदवारांपैकीच 32 जणांना कायम नोकरीची लॅाटरी लागणार आहे.

प्रमाणपत्र नसलेल्यांना 11 महिन्यांची नेमणूक
महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार अनुसूचित जमातीचे वैध प्रमाणपत्र न दिलेल्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. मात्र त्यांना 11 महिन्यांच्या करारावर नियुक्ती दिली गेली आहे. दरम्यान, रिक्त पदांवर भरती करण्यासाठी महापालिकेने विशेष मोहीम राबविली आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. अनुसूचित जमाती (एस.टी.) या प्रवर्गातील राज्यातील सुमारे पाच हजार कर्मचाऱ्यांची सेवा 31 डिसेंबर 2019 पासून थांबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, मोठ्या संख्येने असलेल्या कर्मचाऱ्यांना नोकरी गमावण्याची वेळ येऊ नये यासाठी त्यांना तात्पुरत्या स्वरूपात 11 महिन्यांची नेमणूक देण्यात आली आहे. 

हेही वाचा - बाळासाहेबांच्या स्मारकासाठी नाही या महापालिकेकडे निधी

स्वतंत्र मंत्रीगटाची स्थापना 
सरकारची दिशाभूल करणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर कशाप्रकारे कारवाई करता येईल, सेवाविषयक आणि सेवानिवृत्तीविषयक लाभांबाबत सविस्तर अभ्यास करून शासनास शिफारशी करण्यासाठी स्वतंत्र मंत्रिगटाची स्थापना करण्यात आली आहे. खऱ्या आदिवासींना सरकारी सेवेचा अधिकार मिळावा, त्यासाठी जातवैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जावी, ही त्यामागची भूमिका असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 

 या जागांसाठी होणार भरती (कंसात संख्या) 
स्थापत्य अवेक्षक- कनिष्ठ अभियंता (3), वीज पर्यवेक्षक, सहायक आरेक्षक, शिक्षणसेवक, अनुरेखक, लॅम्पलायटर (प्रत्येकी 1), कनिष्ठश्रेणी लिपिक (8), मिडवाईफ, वाहनचालक व माळी (प्रत्येकी दोन), शिपाई (7) आणि मजूर (3). इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी www.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chance of peramant jpb in solapur corporation