बाळासाहेबांच्या स्मारकासाठी 'या' महापालिकेकडे नाही निधी 

balasaheb thakare
balasaheb thakare
Updated on: 

सोलापूर : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी बजेटमध्ये दोन वर्षांत दोनदा पाच कोटींची तरतूद करण्यात आली. माजी मंत्री विजय शिवतारे व तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते दोन वर्षांपूर्वी उद्‌घाटन समारंभही पार पडला. मात्र, प्रत्यक्षात स्मारकाच्या कामासाठी दमडीही मिळाला नसून शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्याला अद्याप यश आलेले नाही. महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने एवढा मोठा निधी उपलब्ध होईल की नाही, याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तोंडावर बोट ठेवले आहे. 

सोलापूर महापालिकेच्या उत्पन्नाच्या तुलनेत खर्चच अधिक होत असल्याने विकासकामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध होऊ शकलेला नाही. नगरसेवकांना मिळणाऱ्या निधीलाही कात्री लावण्यात आली आहे. शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे प्रमाण वाढले असतानाही नुसतीच डागडूजी केली जात आहे. हद्दवाढ भागात डांबरीकरणाऐवजी मुरुमाचे रस्ते बनविले जात असून ड्रेनेज व पिण्याच्या पाईपलाईनचे कामही रखडलेले आहे. सुमारे 87 हून अधिक मक्‍तेदारांनी केलेल्या कामांची रक्‍कम त्यांना मागील तीन-चार वर्षांपासून मिळालेली नाही. या पार्श्‍वभूमीवर स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी काढलेल्या निवीदीकडे मक्‍तेदारांनी पाठ फिरवली. त्यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून महापालिका आता शासनाकडे सुमारे दोन-अडीच कोटींचा निधी मागणार आहे. शासनाकडून निधी प्राप्त झाल्याशिवाय स्मारकाचे काम कठीण असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

  • स्मारकाचा असा आहे आराखडा 
  • बाळासाहेब ठाकरे यांचा पुर्णाकृती पुतळा 
  • सुसज्ज असे वाचनालय अन्‌ ग्रंथालय 
  • शहर-जिल्ह्यासह परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका 
  • मुंबईतील शिवसेना भवनाच्या धर्तीवर स्मारक बांधणीचा पदाधिकाऱ्यांचा प्रस्ताव 


शिवसेना पदाधिकारी आयुक्‍तांना घालणार घेराव 
सोलापूर शहरात शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक व्हावे असा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. स्मारकासाठी पोलिस मुख्यालय परिसरातील जागा महापालिकेने देण्याचे मान्यही केले. त्याठिकाणी स्मारकाच्या कामाचा उद्‌घाटन समारंभही पार पडला. महापालिकेच्या बजेटमध्ये तरतूद केल्याचे सत्ताधाऱ्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना स्पष्ट केले. मात्र, प्रत्यक्षात स्मारकाच्या कामासाठी दमडाही न मिळाल्याने आता 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीपूर्वी स्मारकाला निधी उपलब्ध न झाल्यास महापालिका आयुक्‍तांना घेराव घालणार असल्याचा इशारा शिवसेना उपशहरप्रमुख प्रताप चव्हाण यांनी दिला आहे. 


मुख्यमंत्र्यांकडे निधीची मागणी 
सोलापूर महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी शासनाकडून दोन-तीन कोटींचा निधी मिळावा, अशी मागणी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी निधी देण्याचे आश्‍वासन केले असून आता महापालिकेच्या माध्यमातून निधीचा प्रस्ताव पाठविला जाणार आहे. शासनाकडून निधी प्राप्त झाल्यानंतर स्मारकाच्या कामाला सुरुवात होईल. महापालिकेने दोन वर्षात दोनदा सुमारे साडेतीन कोटींची तरतूद केली परंतु, केलेल्या कामांची बिले तीन-चार वर्षांपर्यंत मिळत नाहीत. त्यामुळे आतापर्यंत तीनवेळा टेंडर काढूनही मक्‍तेदार पुढे आलेले नाहीत, अशी माहिती विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी दिली. 


पुन्हा निवीदा काढली जाईल 
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी महापालिकेच्या बजेटमध्ये पाच कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. आतापर्यंत तीन वेळा निवीदा काढली, तरीही मक्‍तेदारांकडून त्याला प्रतिसाद मिळाला नाही. आता पुन्हा निवीदा काढली जाईल. 
- संदीप कारंजे, नगरअभियंता, सोलापूर महापालिका 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Rare Smooth-Coated Otters Spotted in Sangli
Miraj Ganeshotsav 2026
Sangli ACB trap exposes a ₹50,000 bribe case
Sunil patil and Sonali Avati
Marathi News Esakal
www.esakal.com