बारामती जिंकणे हा भाजपच्या दृष्टीने हवेतला दावा : चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

सातत्याने पाच वर्ष प्रयत्न केले, तरच रिझल्ट मिळतात. भाजपचे लोक आपले लोक आहेत, असे बारामतीकरांना वाटायला हवे.

बारामती : आगामी विधानसभा निवडणुकीत बारामतीत जिंकणे हा भाजपच्या दृष्टीने हवेतला दावा होईल. मात्र, लोकसभेच्या निकालानंतर बारामतीमध्ये कार्यकर्त्यांनी नाउमेद न होता, 2024 ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत, बारामतीत नक्की परिवर्तन होईल, अशी अपेक्षा भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. बारामतीत भारतीय जनता पक्ष कार्यालयाच्या उदघाटनानंतर आयोजित कार्यक्रमात पाटील बोलत होते.

पाटील पुढे म्हणाले, बारामती लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. लोकसभा व विधानसभेला नेहमी असं झाल की, दरवेळेस कोणीतरी नवीन माणूस दिला गेला, निवडणूक आल्यावरच प्रयत्न झाले, सातत्याने पाच वर्ष प्रयत्न केले, तरच रिझल्ट मिळतात. भाजपचे लोक आपले लोक आहेत, असे बारामतीकरांना वाटायला हवे. पुढील पाच वर्षे सातत्याने लोकांचे काम करण्याची रचना करण्यासाठी कार्यालयाची गरज होती, त्यामुळे बारामतीत कार्यालय सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेतला. 

दर निवडणुकीला परिवर्तन होईल अस वाटायचं, पण दुर्देवाने ती वेळ काही आली नाही. मात्र, या पुढील पाच वर्षांच्या काळात होणारी प्रत्येक निवडणूक बारामती लोकसभा मतदार संघात भाजप तितक्याच ताकदीने लढवेल, अशी घोषणा पाटील यांनी या वेळी केली. या छोट्या निवडणूकातूनच माणसे जोडत आपल्याला पुढे जायचे आहे, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. या लोकसभेच्या निकालाच्या वेळेस खुद्द शरद पवार यांनाही सुप्रिया सुळे विजयी होतील याची खात्री वाटत नव्हती, अशी लढत भाजपने दिली असा दावा त्यांनी केला. 

केंद्र व राज्य शासनाने राबविलेल्या विविध योजनांची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. मजबूर नाही तर मजबूत सरकार देण्याचा निर्णय आता लोकांनीच घेतला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत सातव यांनी, प्रास्ताविक अविनाश मोटे यांनी, तर स्वागत सुरेंद्र जेवरे यांनी केले. 

बारामतीकरांना आता जरा जास्तच भीती निर्माण झालीय
पृथ्वीराज जाचकांनी त्यांचा बंगला कार्यालयासाठी दिल्याचा उल्लेख करुन चंद्रकांत पाटील व्यासपीठावर उपस्थित जाचकांना म्हणाले, काय तुम्हालाही चार फोन एव्हाना आलेच असतील ना, त्यावर जाचकांनी 2004 मध्ये हाच बंगला भाजपचेच कार्यालय होते, अशी आठवण पाटील यांना करुन दिली. त्यावर आता दिवस बदलले आहेत, भीती जरा जास्त निर्माण झालीय, असा अप्रत्यक्ष टोला पाटील यांनी मारला. 

जरा पवारांना सांगा....
राज्यातही आपलंच सरकार येणार आहे, असे म्हणून चंद्रकांत पाटील यांनी उपस्थितांना प्रश्न विचारला की, येणार आहे की नाही आपलं सरकार... लोकांनी होकार देताच... मग जरा सांगा पवारांना... त्यांना अजून वाटतंय की त्यांचच येणार आहे, पण निवडणुकीनंतर मी नियमित बारामतीला वेळ देणार आहे, लोकांना आपली पार्टी वाटावी, असे काम मी करणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrakant Patil comment on Baramati assembly seat