Belagavi सीमा समन्वयमंत्र्यांचा दौरा लांबणीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant Patil

Belagavi : सीमा समन्वयमंत्र्यांचा दौरा लांबणीवर

बेळगाव : महाराष्ट्राचे सीमा समन्वयमंत्री चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई यांचा बेळगाव दौरा लांबणीवर पडला आहे. याबाबतची माहिती मंत्री पाटील यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली. दोन्ही सीमा समन्वयमंत्री व सीमाप्रश्‍नासाठी स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यशील माने हे आता 6 डिसेंबरला बेळगावला येणार आहेत.

मंत्री पाटील, मंत्री देसाई व खासदार माने हे 3 डिसेंबर रोजी बेळगावला येणार होते. त्यांच्या बेळगाव दौऱ्याची माहिती बुधवारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना पाठविण्यात आली होती. पण, 6 डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बेळगावात आयोजित काही कार्यक्रमांना हजर राहण्याचा आग्रह आयोजकांनी केला.

त्यामुळे 3 डिसेंबरचा बेळगाव दौरा रद्द करण्यात आल्याचेही मंत्री पाटील यांनी ट्वीटच्या माध्यमातून सांगितले आहे. दरम्यान, कर्नाटकचे मुख्यंत्री बसवराज बोम्मई 2 डिसेंबरला बेळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. रामदुर्ग तालुक्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काही कार्यक्रम होणार आहे. महाराष्ट्राच्या सीमा समन्वयमंत्र्यांच्या बेळगाव दौऱ्याबाबत, तसेच सीमाप्रश्‍नासंदर्भात सुरु असलेल्या घडामोडींबाबत मुख्यमंत्री बोम्मई काय बोलणार? याकडे सीमावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

महाराष्‍ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई येथे उच्चाधिकार समितीची बैठक घेतली, त्याच दिवशी मंत्री पाटील व मंत्री देसाई यांची सीमासमन्वय मंत्री म्हणून नियुक्ती केली. याशिवाय मंगळवारी तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी खासदार माने यांची नियुक्ती केली. सीमा समन्‍वयमंत्र्यांनी बेळगाव दौऱ्यावर यावे, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीने केली होती. त्याला प्रतिसाद देत दोन्ही मंत्र्यांनी बेळगाव दौऱ्याचे नियोजन केले होते.

दौऱ्याची माहिती लवकरच

बेळगाव दौऱ्यात मंत्री पाटील, मंत्री देसाई व खासदार माने यांच्याकडून सीमालढ्यातील हुतात्म्यांच्या स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले जाणार आहे. याशिवाय, सीमालढ्यातील हुतात्म्यांच्या कुटुंबीयांचे ते भेट घेणार आहेत. 3 डिसेंबरच्या बेळगाव दौऱ्याच्या कार्यक्रमात याबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली. 6 डिसेंबरच्‍या दौऱ्यातील कार्यक्रमांची अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.