चंद्रकांत पाटील यांनी प्रश्‍न वाढवले; जयंतरावांकडून नाव न घेता टोला

अजित झळके
Thursday, 10 December 2020

पुणे पदवीधर मतदार संघातील याआधीच्या नेत्याने पदवीधरांचे प्रश्‍न सोडवण्याऐवजी ते वाढवले. त्यामुळे भाजपच्या बालेकिल्ल्यात पदवीधर मतदारांनी मोठा बदल घडवला. त्या पदवीधरांना न्याय देण्याचे काम आमदार अरुण लाड करतील, असा विश्‍वास जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. 

सांगली ः पुणे पदवीधर मतदार संघातील याआधीच्या नेत्याने पदवीधरांचे प्रश्‍न सोडवण्याऐवजी ते वाढवले. त्यामुळे भाजपच्या बालेकिल्ल्यात पदवीधर मतदारांनी मोठा बदल घडवला. त्या पदवीधरांना न्याय देण्याचे काम आमदार अरुण लाड करतील, असा विश्‍वास जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. 

विधान परिषद निवडणुकीतील यशाबद्दल आमदार अरुण लाड आणि राज्यातील यशाबद्दल प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील यांचा सकल जैन समाजातर्फे सत्कार झाला. येथील राजमती भवनमध्ये उद्योजक सुभाष बेदमुथा यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील, द.भा. जैन सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज व्यासपीठावर होते. 

जयंत पाटील म्हणाले, ""महाविकास आघाडीने घेतलेल्या परिश्रमाला तोड नाही. नागपूरमध्येही पदवीधरांनी कौल दिला. भाजप कामाचा पक्ष राहिलेला नाही, हे त्यांनी ओळखले. या यशामुळे महाविकास आघाडीची एकी कृत्रिम नसून नैसर्गिक असल्यावर शिक्कामोर्तब झाले. आता अरुणअण्णांनी पदवीधरांच्या प्रश्‍नांसाठी सतत सतर्क रहावे. त्यासाठी वेब पोर्टल सुरु करा. मुंबईत एमआयडीसीत ठाण मांडून उद्योग सांगलीकडे कसे येतील, याकडे लक्ष द्यावे. इथल्या तरुणांना भागातच रोजगार दिला पाहिजे. आरक्षण, स्पर्धा परीक्षा वेळेत होणे, रिक्त जागा भरणे यासाठी सरकारशी प्रसंगी संघर्ष करावा लागेल. तो करा, तुम्ही क्रांतीअग्रणी जी. डी. बापू लाड यांचे वारस आहात.'' 

अरुण लाड म्हणाले, ""जनतेच्या उठावातून मी आमदार झालो. पुणे पदवीधर ही भाजपची मालमत्ता नाही, हे सिद्ध केले. त्यांनी खूप भानगडी केल्या, मात्र टिकल्या नाहीत.'' 
सुरेश पाटील म्हणाले, ""कुंडल जैन समाजाचे जुने धार्मिक स्थळ आहे. भगवान महावीरांचे समवशरण तेथे झाले आहे. अरुणअण्णांनी त्याच्या विकासाकडेही लक्ष द्यावे. राज्य सरकारने जैन अल्पसंख्यांकांना अधिकाधिक सवलतींसाठी सकारात्मक विचार करावा.'' 
भालचंद्र पाटील म्हणाले, ""राज्यात भाजपचा करेक्‍ट कार्यक्रम झाला, आता सांगलीत लक्ष घाला.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrakant Patil raised the question; Jayant Patil