चंद्रकांत पाटलांच्याच हस्ते विठ्ठलाची पूजा; शिवसेनेचा बाण भात्यात

अभय जोशी 
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

राज्यात शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या सत्तास्थापनेच्या अनुषंगाने मतभेद दिसत आहेत. अजूनही अंतिम तोडगा दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून काढण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर कार्तिकी एकादशीचा सोहळा शुक्रवार तारीख 8 रोजी होणार आहे. शासन स्तरावर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे 

पंढरपूर : कार्तिकी एकादशी दिवशी श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा चंद्रकांत पाटील यांना करू देणार नाही अशी भूमिका शिवसेनेने घेतली नाही. तालुका संघटक संदीप केंदळे यांचे ते वैयक्तिक मत आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण करणे योग्य नाही. त्यामुळे ठरल्याप्रमाणे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची पूजा होईल. त्यांना शिवसेनेकडुन विरोध केला जाणार नाही. पाटील यांच्यासमवेत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पूजा निर्विघ्नपणे पार पडेल असा विश्वास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला.

राज्यात शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या सत्तास्थापनेच्या अनुषंगाने मतभेद दिसत आहेत. अजूनही अंतिम तोडगा दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून काढण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर कार्तिकी एकादशीचा सोहळा शुक्रवार तारीख 8 रोजी होणार आहे. शासन स्तरावर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे 

दरम्यान काल शिवसेनेचे तालुका संघटक संदीप केंदळे यांनी सध्याचे सरकार हे काळजीवाहू सरकार आहे.  सांगली कोल्हापूर भागातील पूर् परिस्थिती हाताळण्यात चंद्रकांत पाटील हे अपयशी झाले असल्याचा आरोप करून श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा राज्यपाल अथवा एखाद्या विठ्ठल भक्ताकडून करावी. पाटील यांना पूजा करण्यास शिवसेनेचा विरोध राहील असे लेखी निवेदन मंदिर समितीला दिले होते.

या प्रकरणाची शिवसेनेच्या नेत्यांनी गंभीर दखल घेतली आहे. कार्तिकीच्या धार्मिक सोहळ्यात शिवसेनेच्या भूमिकेमुळे वारकऱ्यांना त्रास होता कामा नये असा विचार शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेला आहे.

शिंदे म्हणाले तालुका संघटक केंदळे यांची भूमिका वैयक्तिक स्वरूपाची आहे. शिवसेनेचा त्यांच्या भूमिकेशी संबंध नाही. त्यामुळे शिवसेनेचा पाटील यांना पूजा करण्यास विरोध नाही. किंबहुना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाटील यांच्यासमवेत पुजेस उपस्थित राहावे असे आवाहन आम्ही केले आहे. शिवसेनेचे जिल्हा संघटक शिवाजीराव सावंत यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे अन्य पदाधिकारी पाटील यांच्यासमवेत पुजेस उपस्थित राहणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrakant Patil to worship Vitthal in Pandharpur on the occasion of kartiki Ekadashi