
पेठनाका-सांगली-मिरज हा राष्ट्रीय महामार्ग क्र.166-एच नियोजित रचनेनुसार सांगली आणि मिरज या दोन्ही शहरांच्या मुख्य बाजारपेठेतून जात असल्याने नागरिकांसाठी गैरसोयीचे होणार आहे.
सांगली : पेठनाका-सांगली-मिरज हा राष्ट्रीय महामार्ग क्र.166-एच नियोजित रचनेनुसार सांगली आणि मिरज या दोन्ही शहरांच्या मुख्य बाजारपेठेतून जात असल्याने नागरिकांसाठी गैरसोयीचे होणार आहे. त्यामुळे यात बदल करून हा महामार्ग सांगलीवाडी टोल नाका ते जुना बायपास ते कॉलेज कॉर्नरपासून कुपवाड ते कुपवाड एमआयडीसीमार्गे तानंग फाटा असा करावा, अशी मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली.
मुंबईत आमदार सुधीर गाडगीळ यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन सांगली विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रीय महामार्गाबाबत चर्चा केली. यामध्ये पेठनाका-सांगली-मिरज राष्ट्रीय महामार्ग क्र.166-एच हा आयर्विन पूल ते पुष्पराज चौक ते विश्रामबाग व मिरज असा 12 किमीचा सांगली व मिरज या दोन्ही शहरांच्या मुख्य बाजारपेठेतून जातो. यामुळे दोन्ही शहराला ते गैरसोयीचे होणार आहे.
त्याऐवजी सांगलीवाडी टोल नाका ते जुना बायपास ते कॉलेज कॉर्नर ते कुपवाड ते कुपवाड एमआयडीसी मार्गे तानंग फाटा ते राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 अशी आखणी करावी, अशी मागणी आमदार गाडगीळ यांनी केली. याबरोबरच राष्ट्रीय महामार्गाची कामे वेळेत होणे, प्रशासकीय कामे सुरळीत होणे याकरिता राष्ट्रीय महामार्ग विभाग कोल्हापूर यांचे अधिपत्याखालील उपविभागीय कार्यालय सांगलीला स्थलांतरित करण्याचीही मागणी आमदार गाडगीळ यांनी केली.
कऱ्हाड- तासगाव राष्ट्रीय महामार्ग व पेठ-सांगली-मिरज राष्ट्रीय महामार्ग यांना जोडणाऱ्या पाचवा मैल ते सांगली ही लांबी या राष्ट्रीय महामार्गातून वगळली गेली आहे. पाचवा मैल ते सांगली हा रस्ता अत्यंत रहदारीचा तसेच पलूस-कडेगाव-तासगाव या सांगली जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाच्या तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. त्यामुळे पाचवा मैल-वसगडे-नांद्रे-कर्नाळ-सांगली हा लिंक रोड केंद्र शासनामार्फत लवकरात लवकर विकसित करण्याची मागणी आमदार गाडगीळ यांनी केली.
मंत्री नितीन गडकरी यांनी सर्व गोष्टींचा सकारात्मक विचार करून योग्य ती अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले. यावेळी आमदार सुरेश खाडे, पश्चिम महाराष्ट्र संघटक सरचिटणीस मकरंद देशपांडे, प्रदेश सदस्य शेखर इनामदार, स्थायी सभापती पांडुरंग कोरे, दीपक माने, मोहन व्हनखंडे, धनेश कातगडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
संपादन : प्रफुल्ल सुतार