
कोरोनाच्या आपत्तीमध्ये प्रत्येकाला फिटनेसचे महत्व समजले. त्याचा परिणाम सायकलींची विक्री सर्वाधिक झाली. त्याचबरोबर सध्या मैदानातही खेळाडूंसह वयस्कर मंडळींचीही गर्दी वाढू लागली आहे.
सांगली : कोरोनाच्या आपत्तीमध्ये प्रत्येकाला फिटनेसचे महत्व समजले. त्याचा परिणाम सायकलींची विक्री सर्वाधिक झाली. त्याचबरोबर सध्या मैदानातही खेळाडूंसह वयस्कर मंडळींचीही गर्दी वाढू लागली आहे. सांगलीतील छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर सायंकाळी एकाचवेळी पाचशेच्या आसपास खेळाडू दिसून येतात. संपूर्ण क्रीडांगण खेळाडूंनी फुलून गेल्याचे चित्र दिसून येते.
कोरोनाचा प्रादुर्भाव निर्माण झाल्यानंतर लॉकडाउनमध्ये क्रीडांगणांना कुलूप लावण्यात आले होते. तरीही हौशी मंडळी संरक्षक भिंतीवरून उडी मारून आतमध्ये जाऊन गुपचूपपणे व्यायाम करत होती. याच काळात व्यायामाची आवश्यकता असल्यामुळे मैदाने फिटनेससाठी खुली करा अशी मागणी क्रीडाप्रेमींनी केली होती. क्रीडांगणे बंद असल्यामुळे अनेकांनी खुल्या वातावरणात व्यायामास सुरवात केली. काहींनी जुन्या सायकली बाहेर काढल्या. त्याचबरोबर नव्या सायकलींची हजारोंच्या संख्येने विक्री झाली. त्याचा परिणाम म्हणून सकाळी आणि सायंकाळी सर्वत्र सायकली धावताना दिसतात.
मैदानावर खेळण्यास परवानगी दिल्यानंतर सध्या शिवाजी क्रीडांगण गर्दीने खचाखच भरल्याचे चित्र सायंकाळी दिसून येते. पालकांच्यामध्ये फिटनेसबाबत जागृती झाल्याचा परिणाम म्हणावा लागेल. अनेक पालक-पाल्यांबरोबर मैदानावर हजेरी लावत आहेत. तसेच महिला देखील मुलांना मैदानावर खेळायला सोडून वॉकींग करताना दिसतात. क्रीडांगणावर सध्या पाच ते सहा ठिकाणी क्रिकेटची नेट प्रॅक्टिस सुरू आहे.
तसेच इतरत्र देखील क्रिकेट, फुटबॉल, मैदानी खेळ, खो-खो, हॅन्डबॉल, कबड्डी आदी खेळ खेळले जातात. त्याचबरोबर क्रीडांगणाच्या कडेने चालत फिरणारे आणि धावणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. एवढेच नव्हेतर पॅव्हेलियनमध्ये कराटे, बॉक्सिंग आणि गॅलरीमध्ये योगासह इतर प्रकारचे व्यायाम केले जातात. सायंकाळच्या सुमारास एकावेळी पाचशेच्या आसपास खेळाडूंनी क्रीडांगण फुलून गेल्याचे दिसते. हा कोरोनामुळे पालक आणि इतरांमध्ये जागृती झाल्याचा परिणाम मानावा लागेल.
डॉ. आंबेडकर क्रीडांगणाची प्रतिक्षा-
छत्रपती शिवाजी क्रीडांगणावरील गर्दी कमी करण्यासाठी काही खेळ प्रकार आंबेडकर क्रीडांगणावर स्थलांतरीत होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने सध्या डॉ. आंबेडकर क्रीडांगण लवकर सुसज्ज होण्याची प्रतिक्षा लागून राहिली आहे.
संपादन : प्रफुल्ल सुतार