मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या क्‍लिनचिटचे शिवप्रतिष्ठानकडून स्वागत 

नितीन चौगुले
मंगळवार, 27 मार्च 2018

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांचा कोरेगाव-भीमा दंगलीत कोणताही संबंध नाही, अशी एक प्रकारची क्‍लिनचिटच सरकारने दिल्यानंतर येथील शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.

सांगली : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांचा कोरेगाव-भीमा दंगलीत कोणताही संबंध नाही, अशी एक प्रकारची क्‍लिनचिटच सरकारने दिल्यानंतर येथील शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. मात्र, उद्या (ता. 28) निघणारा मोर्चावर संघटना ठाम असून, हा आता गुन्हे मागे घेण्यासाठी तसे विजयी मोर्चा असेल, अशी घोषणा कार्यवाह नितीन चौगुले यांनी दिली. 

चौगुले म्हणाले,"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत या विषयावर बोलताना संभाजीराव भिडे यांच्या दंगलीतील सहभागाबद्दल पुरावे नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या या निर्णयाचे स्वागत आहे. मात्र, गुरुजींवरील गुन्हे तत्काळ मागे घेऊन सन्मानपूर्वक मुक्तता करावी. पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेवेळी केलेल्या भडक भाषणांमुळेच महाराष्ट्र पेटला. त्यावेळी झालेल्या जातीय दंगलीतील संबंधित नेत्यांना अटक करावी.

दंगलीत झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाने न करता संबंधितांकडून आणि एल्गार परिषदेच्या नेत्यांकडून वसूल करावी, ही मोर्चाची प्रमुख मागणी आहे. उद्याचा (ता. 28) मोर्चा हा आता सन्मान मोर्चा बरोबरच आता विजय मोर्चा असेल. 

दरम्यान, मोर्चासाठी सांगलीत मुख्य चौकात भिडे यांची भली मोठी डिजिटल उभारली आहेत. भगवे ध्वजांनी शहर भगवेमय करण्यात आले आहे. उद्याच्या मोर्चासाठी लाखो धारकरी सहभागी होतील असा अंदाज संयोजकांनी व्यक्‍त केला आहे.

Web Title: Chief Minister gives Lean cheat to Sambhaji Bhide Shivpratishthan