25 ऑक्‍टोबरपासून पेटणार धुराडी ; यंदा ऊस हंगाम महिनाभर आधीच

जयसिंग कुंभार
Tuesday, 29 September 2020

कोरोना आपत्तीच्या सावटाखाली यंदा दसऱ्यापर्यंत म्हणजे 25 ऑक्‍टोबरला म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत यंदा वर्षभर आधीच साखर कारखान्यांची धुराडी पेटण्याची शक्‍यता आहे. साखर आयुक्तांनी 15 ऑक्‍टोबरपासून ऊस गळीत हंगामाची मुभा दिली आहे.

सांगली : कोरोना आपत्तीच्या सावटाखाली यंदा दसऱ्यापर्यंत म्हणजे 25 ऑक्‍टोबरला म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत यंदा वर्षभर आधीच साखर कारखान्यांची धुराडी पेटण्याची शक्‍यता आहे. साखर आयुक्तांनी 15 ऑक्‍टोबरपासून ऊस गळीत हंगामाची मुभा दिली आहे. तथापि कोरोनाचे सावट, परतीचा पाऊस, कारखान्यांसमोरील आर्थिक आव्हाने, ऊसतोड मजुरीवाढीच्या चर्चेचे गुऱ्हाळ आणि शेवटी ऊसदर आंदोलन अशी अडथळ्यांची मोठी माळ असली, तरीही उसाची उपलब्धता आणि कारखान्यांची तयारी पाहता यंदा वर्षभर आधीच हंगाम सुरू होईल असे सध्याचे चित्र आहे. 

परतीच्या पावसाकडे लक्ष 
गतवर्षी 25 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या काळात हंगाम सुरू झाला होता. यंदा मात्र महिनाभर आधीच, म्हणजे दसऱ्यानंतर म्हणजे 25 ऑक्‍टोबरच्या सुमारास हंगाम सुरू होण्याची शक्‍यता आहे. यंदा दिवाळीचे दिवस 12 नोव्हेंबरपासून आहेत. दसरा दिवाळीमधील कालावधी विचारात घेता ऊसतोड मजूर दिवाळी ऊस फडात करतील असे दिसते. यात सर्वांत मोठी अडचण असेल तरी परतीच्या पावसाची. गतवर्षी तो लांबला होता. 

गाळप परवान्यांसाठी 57 अर्ज 
सप्टेंबरअखेर आला तरी यंदाच्या हंगामाबद्दल चर्चेला सुरवात नाही. साखर कारखान्यांना गाळप परवाने घेण्यासाठी 30 सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे. आत्तापर्यंत फक्त 57 कारखान्यांनीच परवान्यांसाठी अर्ज केले आहेत. 37 कारखान्यांचे राज्य शासनाच्या थकहमीसाठी घोडे अडले आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना, तर कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा आणि कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे. राज्य शासनाने थकहमी देऊ केली तरी वित्तीय संस्थांकडून कर्ज उभारणीची प्रक्रिया किती गतिमान होते यावर कारखान्याचे अर्थचक्र ठरणार आहे. 

देखभाल दुरुस्तीची धांदल 
सहकारी आणि खासगी अशा 140 कारखान्यांनी गतवर्षी हंगाम घेतला होता. यंदा दोन्ही मिळून 190 कारखाने हंगाम घेण्याची शक्‍यता आहे. या सर्व कारखान्यांची सध्या देखभाल दुरुस्तीची कामे सुरू आहेत. मात्र टाळेबंदीमुळे या कारखान्यांपुढे खुले सुटे भाग मिळण्यात अडचणी आहेत. परराज्यातून मेस्त्री व कुशल कर्मचारी या कामासाठी मिळण्यातही अडचणी आहेत. पण त्यावरही मात करीत ही कामे नेटाने सुरू आहेत. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chimney to be lit from October 25; This year the shugar mills will starts a month before