छिंदम हाजिर हो... नगरसेवक पद लांगले टांगणीला, या कारणासाठी रहावे लागणार हजर

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 February 2020

महापालिकेच्या तत्कालीन महासभेने छिंदमचे नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव संमत करून नगरविकास विभागाकडे पाठविला होता. या संदर्भात अनेक सुनावण्या झाल्या.

नगर ः छत्रपती शिवाजी महाराजांचा अपशब्द वापरून अवमान करणारा नगरसेवक श्रीपाद छिंदम याचे नगरसेवकपद अडचणीत आहे. तत्कालीन महापालिकेतील सभागृहाने त्याचे पद रद्द झाले पाहिजे, यासाठी ठराव केला होता. त्याबाबतची सुनावणी गुरुवारी (ता. 27) नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील दालनात होणार आहे.

तत्कालीन उपमहापौर छिंदम याने दोन वर्षांपूर्वी महापालिका कर्मचाऱ्याशी दूरध्वनीवरून बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अवमान करणारे अपशब्द वापरले होते. त्याच्या विरोधात राज्यभर असंतोषाची लाट होती.

हेही वाचा - इंदोरीकरांबाबतचा तो व्हिडिअोच डिलीट

महापालिकेच्या तत्कालीन महासभेने छिंदमचे नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव संमत करून नगरविकास विभागाकडे पाठविला होता. या संदर्भात अनेक सुनावण्या झाल्या. गुरुवारी (ता. 27) नगरविकासमंत्री शिंदे यांच्या दालनात सुनावणी होणार आहे.

उपसचिव शं. त्र्यं. जाधव यांनी छिंदम व महापालिका आयुक्‍तांना सुनावणीला उपस्थित राहण्याची सूचना दिली आहे. सुनावणीला मंत्री शिंदे यांचे खासगी सचिव, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, उपसचिवही उपस्थित राहणार आहेत. गेल्या वर्षी महापालिकेच्या निवडणुकीत छिंदम नगरसेवक म्हणून निवडून आला आहे.  

 छिंदम निवडणुकीला उभा राहिला तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राचे त्या निवडणुकीकडे लक्ष लागले होते. मात्र, त्या निवडणुकीत त्याचा विजय झाला. त्यानंतर त्याने छत्रपतींना अभिवादन करून परिमार्जन करण्याचा प्रयत्न केला होता. तरीही शिवप्रेमींच्या मनातील राग काही कमी झालेला नाही. शिवसेनेसह सर्व पक्षांनी त्याच्या विरोधात मोर्चा काढला होता.

त्याची हकालपट्टी करावी यासाठी भाजप नगरसेवकही आग्रही होते. त्यावेळी भाजपाचाच नगरसेवक होता. त्यामुळे लोकांचा भाजपवरही रोष होता. मागील निवडणुकीत मात्र, त्याने शिवसेनेला तोंडघशी पाडण्याचा प्रयत्न केला होता.

विरोधात असतानाही त्याने शिवसेनेला मतदान करून अडचण आणली होती. आता त्याच शिवसेनेच्या मंत्र्यांसमोर हे प्रकरण आहे. याकडेही नगरकरांचे लक्ष लागले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chindam attend called to the ministry for this reason