
ख्रिसमस ट्री’, विद्युत माळांनी बाजारपेठ सजली
बेळगाव : ख्रिस्ती बांधवांचा वर्षातील सर्वात मोठा सण असलेला ख्रिसमस(Christmas) तीन दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे ख्रिसमससाठी स्पेशल साहित्याने बाजारपेठ सजली आहे. मात्र चार-पाच दिवसांपासून शहर आणि परिसरात पुतळ्याच्या विटंबनेच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती तणावपूर्ण असल्याचा परिणाम खरेदीवर झाला आहे. ख्रिसमस(Christmas) जवळ येऊन देखील बाजारपेठेत गर्दी होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना यावेळी मोठा फटका बसण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
ख्रिसमस जवळ येताच मेरी ख्रिसमसची स्टीकर, विविध आकारांतील बेल, विविध रंगी स्टार, घरामध्ये व अंगणात मांडण्यासाठी आकर्षक ख्रिसमस ट्री, विद्युत माळा अशा विविध साहित्याने मारुती गल्ली, पांगुळ गल्ली आदी भागातील बाजारपेठ सजली आहे. ख्रिश्चन बांधवांचा सर्वात मोठा सण असल्याने ख्रिश्चन बांधव हा सण उत्साहात साजरा करतात. तसेच या निमित्ताने घराला रंगरंगोटी करणे, आकर्षक सजावट करणे, यासाठी धावपळ सुरू असते. तसेच सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी आठ ते दहा दिवसांपासून बाजारपेठेत गर्दी होते. मात्र यावेळी बाजारपेठेत तुरळक गर्दी दिसून येत आहे. बाहेरून येणाऱ्या नागरिकांची संख्या रोडावल्याची माहिती व्यापारी वर्गातून दिली जात आहे.
दुसरीकडे शहरातील प्रभू येशू ख्रिस्तांच्या जन्मोत्सवासाठी विविध चर्चमध्ये विशेष सजावट व रोषणाईचे काम सुरु आहे. ख्रिश्चन बांधव घराला रंगरंगोटी करत आहेत. नाताळनिमित्त आपल्या मुलांना, मित्रांना आकर्षक गिफ्टदेखील देण्यात येते. लहान मुलांसाठी सांताक्लॉजची आकर्षक खेळणी, घरामध्ये किंवा अंगणात मांडण्यासाठी आकर्षक ख्रिसमस ट्री, विविध रंगी शोभेच्या वस्तू, स्टार, विद्युत माळा, मेरी ख्रिसमसची स्टीकर, विविध आकारांतील घंटा यांना मागणी आहे. दरवर्षी गोवा, गोकाक, खानापूर या भागातील नागरिक खरेदीसाठी मोठ्या संख्येने येतात. परंतु यावेळी शहरात न येता नजिकच्या बाजारपेठेतून खरेदी करण्यावर अनेकांनी भर दिला आहे.
दरवर्षी ख्रिसमसमध्ये चांगला व्यापार होतो. यावेळी खरेदीसाठी ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. गोवा, गोकाक भागातून येणारा ग्राहक कमी झाला आहे. त्याचा फटका व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे. शेवटच्या दोन दिवसात ग्राहक वाढावेत, अशी अपेक्षा आहे.
-विकी मेहता, व्यापारी, पांगुळ गल्ली