सातारा जिल्हा प्रशासनाच्या 'त्या' भुमिकेबाबत नागरिकांमध्ये असंतोष

सातारा जिल्हा प्रशासनाच्या 'त्या' भुमिकेबाबत नागरिकांमध्ये असंतोष

सातारा : जांभळी (ता. वाई) येथील कोरोनाबाधिताच्या मृत्यूनंतर पत्नी व मुलाची झालेली परवड मांडणारी "बाप मेला होता आणि प्रशासनातील माणुसकीही' ही बातमी वाचल्यानंतर राज्यातील विविध भागांतून वाचकांनी प्रशासनाच्या या मुर्दाडपणावर नाराजी व्यक्त करत सर्वसामन्यांची होणारी परवड मांडण्याबरोबरच त्यांना मदतीची भूमिका घेतल्याबद्दल दैनिक "सकाळ'चे अभिनंदन केले. त्याचबरोबर प्रशासनाने माणुसकी जिवंत ठेवत सर्वसामान्यांच्या मदतीची भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली. त्यातील प्रातिनिधिक प्रतिक्रिया देत आहोत. 

प्रशासनाची लाज वाटते 

अनिरुद्ध ननावरे ः आदरणीय सकाळ माध्यम खरच मी मनापासून आपले आभार मानतो. तुमच्या त्या प्रतिनिधीचे व संपूर्ण टीमचेही. आपण ही गोष्ट लक्षात येताच त्या कुटुंबाची मदत केली. मला प्रशासनाची तर लाज वाटते. त्यांनी तरी असे नव्हते करायला पाहिजे. शाहानिषा करून त्या कुटुंबाजवळ पोचले पाहिजे होते. पालकमंत्र्यांना माझे सांगणे आहे, की तुम्ही जनतेकडे लक्ष देऊ नका, स्वत:ची काळजी घ्या. जनता राहील न राहील तुम्हाला जनतेवर राज्य करायचे आहे ना? 

हलगर्जीपणा खेदजनक 
नितीन काशीद- पाटील (शिवसेना कऱ्हाड, तालुकाप्रमुख) ः कोरोना संशयित मृताच्या नातेवाईकाबाबत जिल्हा प्रशासनाने मानवतावादी दृष्टिकोनातून न बघता केवळ औपचारिक सोपस्कार पूर्ण केले. याबाबत "सकाळ'च्या प्रतिनिधींनी एक जबाबदार व कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून माया-लेकरांना आधार देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले, तसेच प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्नही केला. प्रशासनाचा हलगर्जीपणा ही बाब पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने खेदजनक आहे. मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालावे म्हणून मी प्रयत्न करणार आहे. 

सुवर्णमध्य साधवा 

सूर्यकांत घाडगे ः प्रशासनावर सध्या ताण वाढला आहे. आपण त्यांना समजून घेतले पाहिजे. त्याचबरोबर माणुसकीची विटंबना होणार नाही याची काळजीही प्रशासनाने घेतली पाहिजे. या महामारीत समाज आणि शासन या दोघांकडून माणुसकी जिवंत राहण्यासाठी सुवर्णमध्य साधला गेला पाहिजे. कोरोना योध्यांची माणसिकता टिकून राहण्यासाठी "सकाळ'ने या दोन्हीमधील कटूता कमी करण्यासाठी प्रग्लभ भूमिका घ्यावी. 

माणुसकी हरवली गेली 

सिद्धार्थ खरात ः घरचा कर्ता पुरुष गेल्यावर मागच्यांचे कंबरडे मोडते याची जाणीव जिल्हाधिकरी व पालकमंत्र्यांना कळली असते, तर आजची "सकाळ'ची बातमी सकारात्मक परिणाम मांडणारी आली असती; परंतु प्रशासनाची माणुसकी हरवली गेली असल्याने त्यांना ते साधता आले नाही. यापुढे असे कोणाच्या वाट्याला येऊ नये, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी. बातमी व मदत दोन्हीसाठी "सकाळ'चे आभार. 

...अन्‌ मन सुन्न झाले 

नानासाहेब इवरे (टाकळवाडी, ता. फलटण) ः "बाप मेला होता अन्‌ माणुसकीही' ही बातमी वाचली अन्‌ मन सुन्न झाले. ही घटना राजेंच्या राजधानी साताऱ्यात होऊ शकत नाही. येथे रात्री फुटपाथवर झोपणाऱ्यांना पांघरून मिळते. कितीही गरीब असला तर उपाशी झोपत नाही आणि वडील गेले म्हणून कोणाला एवढं पोरक व पती गेले म्हणून एवढे हाल कुणाचे यापुढे होणार नाहीत 
एवढी दक्षता प्रशासनाने घेतलीच पाहिजे. जसे संशयित म्हणून आणले तसे मृत्यू झाल्यानंतर पण त्यांना घरी पोचवणे किंवा त्यांना गरजेच्या वस्तू पोचवल्या पाहिजेत. कारण घरातला कर्त्या पुरुषाचा मृत्यू होणे म्हणजे घरावर आघात आहे. 

धन्यवाद त्या पत्रकाराचे 

प्रसन्न कासार (पाचोरा, जळगाव) ः जांभळगाव येथील कोरोनाबाधित मृताच्या कुटुंबाबाबत घडलेला प्रकार धक्कादायक वाटला. मृताच्या खिशातून पैसे काढावे लागले. सरकारी कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा कहर झाला. एकीकडे सरकार जनजागृती करत आहे आणि एकीकडे काही कर्मचारी निष्काळजीपणा दाखवत आहेत. काय म्हणावे काय तेच कळत नाही. अशा या प्रकरणी त्यांचे रिपोर्ट रात्री दहा वाजता आल्यानंतर सगळे जागे झाले. मग शोधाशोध सुरू झाली. शब्दच उरले नाहीत आता सांगायला. धन्यवाद त्या पत्रकाराचे त्याने त्या आई व मुलाला जेऊ तरी घातले. 

अनिल गायकवाड ः "सकाळ'मधील वृत्त वाचून मन सुन्न झाले. या बातमीवरून एवढेच म्हणावेसे वाटते, वेळ प्रत्येकावर येते, नियती कोणालाही सोडत नाही. 

संदीप संकपाळ ः असल्या प्रशासनाची काही गरज नाही. सामान्य जनतेने कुठं बघायचे. प्रशासनाला पैसा कमी पडायला लागलाय वाटत? अशा प्रशासनाला चांगली अद्दल घडवली पाहिजे. 

प्रकाश पाटील ः लोकांची काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद 

यशवंत घाडगे ः हेच प्रशासनातील अधिकारी सातारा पालिकेचे मुख्याधिकारी एक मृतदेह दहन केल्यानंतर राज्यभर ऊर बडवून घेत स्वत:चा डंका पिटत होते. आता काय झाले होते त्यांना? 

सुरजकुमार निकाळजे ः फार दुर्दैवी बाब. "सकाळ'ने पर्दाफाश केला हे बेरे झाले. निदान जिल्ह्यात चाललेय काय हे तरी समजले. धन्यवाद. 

अरुण तावरे ः आजची परिस्थिती खूप संवेदनशील आहे. जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी चांगले काम करतात. परिस्थितीने असे होऊ शकते. 

मोहीत काळे ः त्या माया- लेकरांच्या अवस्थेला प्रशासन आणि पालकमंत्री दोघेही जबाबदार आहेत. त्यांनी तातडीने योग्य ती कार्यवाही करणे आवश्‍यक होते. त्यांना मदतीची भूमीका घेतल्याबद्दल "सकाळ'चे आभार. 

नितीन साळुंखे ः प्रशासनाकडून यापुढे अशा घटना घडणार नाहीत, याची खबरदारी घेतली पाहिजे. धन्यवाद सकाळ. बातमीबरोबर माणुसकीही जपली. 

प्रा. धनंजय देवी ः अतिशय चीड आणणारी घटना आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाकडून माणुसकी भाव जपणे आवश्‍यक आहे. यापुढे याबाबतची दक्षता घेतली गेली पाहिजे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com