आणखी एका लढ्यासाठी सातारा थांबला ! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

सर्वजण घरात असताना पोलिस मात्र सर्वांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर होते. दुकाने व हॉटेल बंद असल्याने त्यांच्या खाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्‍न होता. हे ओळखून शहरातील काही नागरिक व सेवाभावी संस्थांनी त्यांच्यासाठी खाण्याची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. काही जणांकडून पोलिसांना मास्कचेही वाटप करण्यात आले.

सातारा : शांती परते नाही सुख, येरे अवघेची दुःख... म्हणउनी शांती धरा, उतरा पैलतीरा... खवळलिया कामक्रोधी, अंगी भरती आधी व्याधी, तुका म्हणे त्रिविध ताप, जाती मग आपोआप... या अभंगातील शिकवणीप्रमाणे सध्याच्या परिस्थितीत घराबाहेर पडण्याचा मोह टाळत समस्त सातारकर जिल्हावासीयांनी कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे "जनता कर्फ्यू'चे पहिले पाऊल आज (रविवारी) सक्षमपणे टाकले. इतिहासात अनेक लढे जिंकणारा लढवय्या सातारा जिल्हा कोरोनाविरुद्धच्या या लढ्यासाठी शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आज जागीच थांबला. संपूर्ण जिल्ह्याने कधी नव्हे एवढ्या नीरव शांततेची अनुभूती आज घेतली. 

देशात व राज्यात कोरोनाचे सावट दिवसेंदिवस अधिक गडद होत चालले आहे. राज्यातील रुग्णांची संख्या दोन दिवसांत दहाने वाढली आहे. मृतांची संख्या दोनवर गेली आहे. एकमेकांशी संपर्क आल्यानंतर कोरोना व्हायरसचा प्रसार होतो. त्यासाठी गर्दी टाळणे अत्यावश्‍यक आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी सात ते रात्री नऊपर्यंत जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. देशातील सर्व नागरिकांनी या कालावधीत घरातच राहण्यास त्यांनी सांगितले होते. पंतप्रधानांच्या या आवाहनाला व कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील पहिल्या मोठ्या आव्हानाला सातारकरांनी आज "न भूतो न भविष्यती' असा प्रतिसाद दिला. आज सकाळपासून शहरासह जिल्ह्यातील सर्वच महामार्ग, राज्य व गाव, गल्ली-बोळांतील रस्ते ओस पडले होते.
 
जनता कर्फ्यूच्या निमित्ताने आज राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व गाड्या, प्रवासी वाहतुकीची सर्व वाहने बंद होती. त्यामुळे नेहमी गर्दी असलेली सर्व बस स्थानके, रिक्षा थांबे, प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे थांबे ओस पडलेले होते. नेहमी शेकडोंनी लोकांची उपस्थिती असलेल्या शहरातील मुख्य बस स्थानक व राजवाडा बस स्थानकावर एकही व्यक्ती दिसत नव्हती. शहरातील नागरिकांनीही कुटुंबासमवेत घरातच राहणे पसंत केले. त्यामुळे शहरातील राजपथ, कर्मवीर भाऊराव पथ, राधिका रस्ता, कोरेगाव रोड, पोवई नाक्‍यावरील सातही रस्त्यांवर पोलिसांच्या वाहनांव्यतिरिक्त कोणतीच वाहने नव्हती. मंगळवार तळे, बॉम्बे रेस्टॉरंट परिसर, वाढे फाटा, शिवराज तिकाटणे, अजंठा चौक, पोवई नाका, मंडई अशी ठिकाणे निर्मनुष्य होती. उपगनरांमध्येही नागरिक घराबाहेर न पडल्यामुळे शांतता होती. 

Coronavirus : प्रतिक्षा संपली; सातारकरांसाठी गुड न्यूज

आज सकाळी सातपासूनच शहर व शाहूपुरी पोलिस सक्रिय झाले होते. शहरातील चौका-चौकांमध्ये पोलिस उभे होते. तसेच पोलिसांची वाहने शहर व उपनगरांमध्ये गस्त घालत होती. जनता कर्फ्यू असूनही रस्त्यावर येणाऱ्यांची पोलिसांकडून विचारपूस केली जात होती. अत्यावश्‍यक असे महत्त्वाचे कारण असेल तरच पोलिसांकडून संबंधिताला पुढे जाऊ दिले जात होते. अगदी तुरळक जण शहरातील परिस्थिती पाहण्यासाठी रस्त्यावर फिरायचा प्रयत्न करत होते. परंतु, पोलिसांना पाहिल्यानंतर ते घरचा रस्ता धरत होते. त्यामुळे संपूर्ण शहरामध्ये नीरव शांतता पसरली होती. अगदी दुचाकी वाहन गेले तरी त्याचा मोठा आवाज सर्वांना जाणवत होता. परंतु, नेहमीचा गोंगाट नसल्यामुळे शहरातही पक्ष्यांचा आवाज ऐकण्याच्या आनंदाची अनुभूती सातारकरांना आज अनुभवता आली.

कामाचं रोजचं रहाटगाडगं म्हणजे जिंदगी नसते राव 

आज सकाळपासूनच शहरातील अत्यावश्‍यक सुविधेसह सर्वच दुकाने बंद होती. जिल्हा व अन्य रुग्णालयांच्या परिसरातही तशीच अवस्था असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची मात्र, थोडी परवड झाली. प्रवासी वाहतुकीची वाहने बंद असल्याने उपचारासाठी रुग्णालयात येण्याची आवश्‍यकता असलेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनाही खासगी वाहनांचाच आधार घ्यावा लागला. 
सर्वजण घरात असताना पोलिस मात्र सर्वांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावर होते. दुकाने व हॉटेल बंद असल्याने त्यांच्या खाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्‍न होता. हे ओळखून शहरातील काही नागरिक व सेवाभावी संस्थांनी त्यांच्यासाठी खाण्याची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. काही जणांकडून पोलिसांना मास्कचेही वाटप करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens Of Satara Satyed At Home And Supported Janta Cerfew