जगा वेगळं गाव : इथल्या मातीतही वाजतं संगीत, मुलं रडतातही सुरात

The city of Miraj in South Maharashtra is famous as the city of classical music
The city of Miraj in South Maharashtra is famous as the city of classical music

पुणे : महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील एक तालुका म्हणजे दक्षिण महाराष्ट्रातील मिरज शहर. हे वैद्यकीय सोईसुविधा आणि शास्त्रीय संगीताचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे. भारतीय संगीतात तंतुवाद्यांचे एक वेगळे स्थान आहे. मिरज शहराची खास ओळख म्हणजे तंतुवाद्यांची निर्मिती करणे होय.

जगभरातील प्रत्येक कलाकारांच्या हातामध्ये मिरजेमधीलच तंतुवाद्य आहे. इतिहासात पहिल्यांदा कोरोनामुळे तंतुवाद्य निर्मितीची शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या गावात थोडासा फटका बसलेला आहे. महाराष्ट्रातील छोटेसे मिरज शहर येथील तंतुवाद्ये अतिशय प्रसिद्ध आहे. येथील वाद्ये भारतासह, अमेरिका, जापान, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, दुबई यासह जगभर पाठविली जातात.

त्यात तानपुऱ्याचे मेल आणि फिमेल असे दोन प्रकार आहेत. कमीतकमी एक वाद्य तयार करायला एक महिना लागतो. वाद्याचं नक्षीकाम, उंची आणि रुंदीनुसार त्याचा आकार तयार करणे, पॉलिश आणि त्यावर रंगकाम करणे, शेवटी त्यातून सूर काढणे, असे प्रत्येक काम वेगवेगळे व्यक्ति करतात. यामुळे कमी वेळात एखादं वाद्य लवकर तयार होतं. कलाकाराच्या मागणीनुसार प्रत्येक वाद्य तयार केलं जातं. कोणतंही वाद्य आधीच तयार करून ठेवलेलं नसतं. गुरुंच्या मार्गदर्शनानुसार तानपुरा बनवला जातो.  

अशी झाली सुरवात
 
मिरजमध्ये १८५० साली स्वर्गीय फरीद सतारमेकर यांनी पहिला तानपुरा तयार केला. त्यांनी सुरवातीला तीन पिढीपर्यंत तंतुवाद्य निर्मितीवर सखोल अभ्यास केला. त्यावेळी त्यांनी लहान वाद्य तयार करण्यास सुरवात केली. त्या वाद्यांवर १० वर्षे वेगवेगळे प्रयोग केले. त्याचा सखोल अभ्यास करून तिसऱ्या पिढीनंतर तंतुवाद्यांची विक्री करण्यास सुरवात झाली. सध्या त्यांची सहावी पिढी त्यांचा व्यवसाय आजतागायत चालवत आहे. 
 
गावाचं असंही वेगळेपण

या गावातील लहान मुलं रडताना सुद्धा सुरात रडतात असे ग्रामस्थ म्हणतात. तसेच मिरजेच्या जमिनीला कान लावलं तरी संगीत ऐकू येत अशी म्हण असल्याचं तेथील गावकरी म्हणतात. 

यामुळे येथील लोक तंतुवाद्य निर्मितीकडे वळली

मिरजेत तंतुवाद्य निर्मितीची शेकडो वर्षांपासूनची परंपरा आहे. ज्यावेळी लढाया संपल्या त्यावेळेचे भालेदार यांना काही काम राहिले नाही म्हणून ही लोक  तंतुवाद्य निर्मितीकडे वळली. शास्त्रीय तंतुवाद्ये हाताने तयार केली जातात. तंतुवाद्यांची निर्मिती करण्यासाठी कोणत्याही मशीनचा वापर केला जात नाही. लाकडाचा सांगाडा, त्यावरचं नक्षीकाम, पॉलीश, तारा लावणे आणि नंतर ते प्रत्यक्ष वाजवणे ही सर्व कामे हातानेच केली जातात.

एका वाद्याची निर्मिती करण्याचा कालावधी 

मोठ्या प्रमाणातल्या उत्पादनाऐवजी दर्जेदार उत्पादनावर भर देणारे वाद्ये पारंपरिक पद्धतीने घडवणे आणि राखण्यासाठी एका वाद्याची निर्मिती करायला  कमीत कमी एक महिना लागतो. यामध्ये लाकडी काम करणारे, नक्षीकाम कोरणारे, पॉलिश काम करणारे, सूर काढणे, तारा लावणे आणि जवारी लावणे (गवयाच्या सुरानूसार वाद्याचा आवाज खुलवण्याची क्रिया) अशा पद्धतीने पाच कारागिरांच्या हातून तंतुवाद्यांची निर्मिती केली जाते. 

ही आहेत तंतुवाद्यांची नावे 

भारतीय तंतुवाद्य    :   सतार, तंबोरा, सारंगी, दिलरुबा, सरोद, तारवाद्य, तानपुरा, संतूर, ताऊस, बीन, सरोद
पाश्च्यात्य तंतुवाद्य  :  गिटार, व्हायोलिन , मेडोलियन  

तानपुरा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य 

तानपुऱ्यासाठी लागणारे मोठ्या आकारांच्या भोपळ्यांना जंगली भोपळे म्हणतात. मंगळवेढा तालुक्यातून या भोपळ्यांची खरेदी केली जाते. यासाठी लागणारा लाकूड कर्नाटकामधून आणला जातो. तसेच त्यावर डिझाईन बनवण्यासाठी प्लास्टिक, तारा, कुंटी, ब्रीझ, पॉलिश पेपर, कलर आणि लाख याचा वापर केला जातो. तानपुऱ्याची किंमत ही १५ हजार रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत आहे. 

वाद्यांची निगा कशी राखली जाते
 
वाद्य तयार केल्यानंतर ते रोज वापरावे लागते जेणेकरून संगीताचे मधुर सूर निर्माण होतील. तसेच उन्हाळयामध्ये उन्हाचा तडाखा बसला तर तंतुवाद्य ढिलं पडतात. आणि पावसात हे वाद्य मऊ पडतात. त्यामुळे त्याची निगा राखण्यासाठी चांगल्या ठिकाणी ठेवावे लागते आणि त्याची काळजी घ्यावी लागते. वर्षातून एकदा त्याला नवीन तारा बसवावे लागतात. ब्रीझ हा तानपुऱ्याचा हृदय आहे. ब्रीझ घालून ते लेव्हल केल्यामुळे त्याचा आवाज व्यवस्थित राहतो. 

जंगली भोपळ्यांची इंच

स्त्रिया वापरत असलेल्या जंगली भोपळ्यांची इंच :  ४७, ४८ इंच 
पुरुष वापरत असलेल्या जंगली भोपळ्यांची इंच  :  ५१, ५४, ५७ आणि ६० इंच 

मिरजेमध्येच एका वर्षात किमान १२ संगीत महोत्सव 

प्रख्यात गायक उस्ताद अब्दुल करीम खान यांचे मिरजेत दीर्घकाळ वास्तव्य होते. त्यांच्या नावाने दरवर्षी संगीत महोत्सव भरवला जातो. उस्ताद अब्दुल करीम खान यांच्या स्मरणार्थ ख्वाजा शमसुद्दीन मीरा साहेब वार्षिक संगीत महोत्सव साजरा होतो. महाराष्ट्रात फक्त मिरजेमध्येच एका वर्षात किमान १२ संगीत महोत्सव होतात. भारतातील अनेक दिग्ग्ज या ठिकाणी आवर्जून भेट देऊन जातातच. मिरजेतील हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या या समृद्ध परंपरेमुळे मिरजेचे स्थान देशात उलेखनीय असे आहे.

मिरजेचे प्रसिद्ध गायक

पं. विष्णू दिगंबर पलुसकर, उस्ताद अब्दुल करीम खान, पंडित निकालके भातखंडे, हिराभाई बडोदेकर आणि पं. विनायकराव पटवर्धन हे मिरजेचे प्रसिद्ध गायक होते.

मी वयाच्या १५ व्या वर्षांपासून वाद्यांची निर्मिती करत आहे. आमच्या घरचा व्यवसाय असल्यामुळे कमी शिक्षण घेतले. हा व्यवसाय टिकवण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रत्येक वाद्य जे आम्ही बनवतो, त्यामागे आमच्या भावनाच असतात. त्यामध्ये गुणवत्ता कायम कशी राखली जाईल, याचा आम्ही खूप विचार करतो. सर्वच वाद्यांची निर्मिती करण्यात आम्हाला आनंद मिळतो. आमच्या घरामध्ये १५०-२०० वर्षांमध्ये मला जपान येथे तंतुवाद्यनिर्मितीविषयी कार्यशाळेसाठी आमंत्रित केले होते. आम्ही या पेशाकडे व्यवसाय म्हणून न पाहता कलाकारांशी आयुष्यभराचे नाते जोडण्याचा त्यामागचा उद्देश असतो. सध्या इलेक्ट्रॉनिक वाद्य तयार होऊ लागल्यामुळे ही वाद्य खरेदी करण्याचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे.  
- मजीद सतारमेकर, तंतुवाद्य निर्माते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com