सांगली शहराची दोन दिवसांत पावसाने उडवली दाणादाण

शैलेश पेटकर
Thursday, 6 August 2020

गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसाने शहराची पार दाणादाण उडवून दिली आहे. शहरातील सखल भागात पाण्याची तळी निर्माण झाली.

सांगली : गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसाने शहराची पार दाणादाण उडवून दिली आहे. शहरातील सखल भागात पाण्याची तळी निर्माण झाली असून गुंठेवारी भाग चिखलमय झाला आहे. आज सकाळपासून दमदार पावसाने शहरात जनजीवन विस्कळित झाले. कृष्णा नदीवरील बंधाऱ्यावरुन पाणी वाहू लागले. 

विश्रांतीनंतर गेल्या दोन दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. आज सकाळपासून दुपारपर्यंत संततधार सुरू होती. शहरासह परिसरात पावसाने हजेरी लावली. महापालिका क्षेत्रात दोन्ही दिवसात सलग दिवसभर पावसाच्या रिपरिपीमुळे नेहमीप्रमाणे उपनगरांची अवस्था दयनीय झाली. त्यावेळी रस्त्यावर वाहन नेणेही कठीण झाले होते. झोपडपट्टीतील लोकांची परीक्षा पाहणारा पाऊस ठरला. कोसळणाऱ्या पावसाने रस्त्यांवर पाणीच पाणी साचून राहिले. 

झुलेलाल चौक, राजवाडा, पटेल चौक, विश्रामबाग चौक आदीसह उपनगरातील सखल भागात पाण्याची तळी निर्माण झाली होती. त्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागली. तसेच शामरावनगरसह परिसरातील गुंठेवारी भागाला दणका दिला. काही भागात नव्याने रस्ते झाले असले तरी अद्याप बहुतांशी भाग विकासापासून वंचित आहे. महापालिकेने पावसाळ्याआधी खड्डे न भरल्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. शामरावनगर भागातील खुल्या भूखंडावर पाण्याची तळी निर्माण झाली होती. 

विश्रामबागसह उपनगरातील काही भागात ड्रेनेजसाठी खोदाई करण्यात आली होती. खोदाईनंतर त्याठिकाणी मुरमीकरण करण्यात आले नाही. उकरलेली मातीचे ढीगही अनेक ठिकाणी तसेच पडून आहे. त्यामुळे अशा भागात चिखल होऊन वाहनचालक घसरुन पडण्याचे प्रकारही झाले. अशा ठिकाणी महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्या, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The city of Sangli was hit by heavy rains in two days