ढगफुटीने हुक्केरीत लाखोंचे नुकसान : वाहून जाणाऱ्या दोघांना जीवदान

सकाळ वृत्तसेवा
Monday, 12 October 2020


 आमदार कत्ती, जिल्हाधिकाऱ्यांची भेट 

हुक्केरी (बेळगाव) : शहरात रविवारी (ता. 11) झालेल्या ढगफुटीमुळे बऱ्याच घरांसह दुकानात पाणी शिरल्याने लाखोंचे नुकसान झाले. जोरदार पाण्याच्या प्रवाहातून वाहून जाणाऱ्या वृद्धासह दोघांना वाचविण्यात यश आले. सोमवारी (ता. 12) सकाळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी शहराला भेट देऊन नुकसाग्रस्त भागाची पाहणी केली. नगरपालिकेत आमदार उमेश कत्ती व जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा झाल्यानंतर नुकसाग्रस्त भागातील नालेसफाई करण्याच्या सूचना दिल्या. तसेच ओढ्यावरील पुलाची उंची वाढविण्याचे आदेश दिले.

पत्र्याचे शेड कोसळून मृत झालेल्या वेल्डिंग दुकानदार अस्लम अल्लाखान यांच्या कुटुंबियांना पाच लाखांचा निधी देण्याची घोषणा केली. यावेळी अशोक तेलीसह इतर अधिकारी उपस्थित होते. 
रविवारी झालेल्या पावसाने जुन्या बसस्थानकावरील महावीर इलेक्‍ट्रॉनिक्‍सचे 18 मोनो ब्लॉक पंपसेट खराब झाल्यामुळे 18 लाखांचे नुकसान झाले. कर्नाटक क्‍लॉथ स्टोअर, राज सायकल मार्टसह इतर दुकानात पाणी शिरल्याने दोन लाखांचे नुकसान झाले आहे. कर्नाटक क्‍लॉथ सेंटरमध्ये आणलेले दसरा व दिवाळी सणासाठी साड्या व इतर साहित्य भिजून 10 लाखाचे नुकसान झाले आहे.

या पावसाने मासाबी दर्गाह ते प्रवेशद्वारापर्यंत रस्ता खराब झाला आहे. मुसळधार पावसामुळे वीज पुरवठा दोन दिवस खंडीत झाला होता. मासाबी दर्गाहजवळची काही छोटी दुकाने वाहून गेल्याने त्यांचेही नुकसान झाले आहे. घरांच्या भिंती पडल्याने अनेकांना मोठा फटका बसला. नुकसानीचा सर्व्हे करण्याचे काम सुरू आहे. अचानक झालेल्या या ढगफुटीने शहरात लाखोंचे नुकसान झाले आहे. त्यामुळे भरपाई देण्याची मागणी होत आहे. 

हेही वाचा- सहा महिन्यांनी कोयना एक्‍सप्रेस रूळावर : पण महालक्ष्मीची प्रतीक्षा -

महावीर निलजगी ठरले "त्यांच्या'साठी देवदूत! 
रविवारी पाण्याच्या लोंढ्यातून नजीर अब्दूल शेगडी (वय 70) व त्यांचा नातू सोहिल शेगडी (वय 20) हे वाहून जात होते. मात्र महावीर उद्योग समूहाचे अध्यक्ष महावीर निलजगी यांनी देवदूताप्रमाणे सहकाऱ्यांसमवेत धाऊन जात दोरी सोडून दोघांचे प्राण वाचविले. त्यामुळे निलजगी यांच्या मदतीसह धाडसाचे परिसरातून कौतुक होत आहे.  

 संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cloudburst caused flooding in many houses and shops, causing loss of millions