CM Basavaraj Bommai : भाजप पुन्हा सत्तेवर येईल; मुख्यमंत्री बसवराज बोम्मई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM Basavaraj Bommai statement BJP will come back to power politics

CM Basavaraj Bommai : भाजप पुन्हा सत्तेवर येईल; मुख्यमंत्री बसवराज बोम्मई

बंगळूर : भाजपला पुन्हा १०० टक्के जनादेश मिळेल आणि राज्यात पुन्हा सत्ता येईल, असा अढळ विश्वास मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केला. वसंतनगर येथील राजपूत भवन येथे आयोजित ‘बूथ विजय अभियान’ कार्यक्रमाचे उद्‍घाटन करताना ते बोलत होते.

ते म्हणाले, ‘‘केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगिरीच्या आधारे आम्ही निवडणुकीत उतरू. जनतेने आमचे कार्यक्रम स्वीकारले असल्याने पुढील निवडणुकीतही ते आम्हाला आशीर्वाद देतील. आमच्या विजयाची सुरुवात शिवाजीनगर मतदारसंघातून होईल.

राष्ट्रीय व प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार बुथ विजय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आम्ही मेट्रोचा दुसरा टप्पा २०२४ पर्यंत पूर्ण करु. कावेरीचे पाणी बंगळुरूला आणण्यासाठी काम करत आहोत.’’

तळागाळातून पक्षाला मजबूत करण्यासाठी आणि १५० जागा जिंकण्यासाठी भाजपच्या बुथ विजय अभियानाला राज्यभरात सुरुवात करण्यात आली आहे. मुख्यमंत्री बोम्मई यांनी बंगळुरमध्ये तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांनी त्यांच्या मंगळूरमध्ये या मोहिमेचा प्रारंभ केला.

आजपासून १२ जानेवारीपर्यंत राज्यभरातील ३९ संघटना, ३१२ मंडळे, ११४५ महाशक्ती केंद्र, ११ हजार ६४२ शक्ती केंद्र आणि ५८ हजार १८६ मतदान केंद्रांवर ही मोहीम राबविण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री, खासदार, आमदार, अधिकाऱ्यांसह २० लाख कामगार सहभागी होणार आहेत.

मतदान केंद्रस्तरीय समिती, व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करणे, मन की बात पाहण्यासाठी ६० हजार ग्रुप तयार करणे यासह ५० लाख घरांवर पक्षाचा झेंडा फडकवण्याचा हा कार्यक्रम असून त्यातून लक्ष्यितांना जिंकण्यासाठी प्रेरित करणे अपेक्षित आहे.

झेंडे फडकावून प्रारंभ

तसेच जिल्हा प्रभारी मंत्री, केंद्रीय मंत्री, आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष आदींनी विविध जिल्ह्यांतील आपापल्या घरावर व कार्यालयांवर पक्षाचे झेंडे फडकवून प्रचाराचा प्रारंभ केला आहे.