इथल्या विधवांना मिळाले संक्रांतीचे वाण 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 2 February 2020

पाथर्डीतील जुना भाजीबाजार परिसरात जन-मन महिला सेवाभावी संस्थेतर्फे शनिवारी विधवांचा गौरव करणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पाथर्डी : संक्रांतीनिमित्त विविध ठिकाणी हळदी-कुंकवाचे कार्यक्रम होतात. त्यात सुवासिनींनाच आमंत्रित केले जाते. या कार्यक्रमात विधवा महिला सहभागी होऊ शकत नाही, झाल्या तरी ते अपशकुन मानले जाते. परंतु ही रूढी-परंपरा मोडण्याचे काम झाले. आणि तेही महिलांनीच केले. पाथर्डी येथे हे प्रागतिक पाऊल पडले. 

जन-मन महिला सेवाभावी संस्थेचा पुढाकार 
संक्रांतीच्या वाणापासून दूर राहणाऱ्या विधवा महिलांना एकत्र करून त्यांना वाण देऊन सामूहिक हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करीत वेदनेतील सुख शोधण्याचा मंत्र शहरातील महिलांना येथील जन-मन महिला सेवाभावी संस्थेतर्फे देण्यात आला. 

विधवांचा गौरव 
पाथर्डीतील जुना भाजीबाजार परिसरात जन-मन महिला सेवाभावी संस्थेतर्फे शनिवारी विधवांचा गौरव करणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वासंती फुटाणे होत्या. जन-मन संस्थेच्या प्रमुख मनीषा ढाकणे, डॉ. उषा जायभाये, माजी नगराध्यक्ष रत्नमाला उदमले, नगरसेविका सविता डोमकावळे, सविता भापकर, माजी नगरसेविका मनीषा उदमले, आरती निऱ्हाळी, अलका जोजारे, श्रद्धा जिरेसाळ, संगीता शर्मा, सुनीता एडके, सुशीला गुरव, कमल पवार, सुलोचना तरटे उपस्थित होत्या. 

दिलासा मिळाला 
पती गेल्यावर होणारी एकाकीपणाची भावना मनाला दुःख तर देतेच; मात्र समाजाच्या अनेक बंधनांमुळे अनेक गोष्टींना मुरड घालावी लागते, अशी भावना अनेक महिलांनी व्यक्त केली. महिलांनी गुरुपद (भजन) गायिले. प्रास्ताविक रत्नमाला उदमले यांनी केले. सूत्रसंचालन मनीषा उदमले यांनी केले. आरती निऱ्हाळी यांनी आभार मानले. 

त्यांना आधाराचा प्रयत्न 
विधवांच्या जीवनात पतीची उणीव भरून निघणे शक्‍य नाही; परंतु त्यांना सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार असतोच. समाजातील काही रूढी-परंपरांमुळे विधवांच्या मनावर नकळत खूप अन्याय झाल्याची भावना वाढते. आम्ही जन-मन महिला सेवाभावी संस्थेतर्फे हळदी-कुंकू व वाणवाटपाचा कार्यक्रम घेतला 
- मनीषा ढाकणे, अध्यक्ष, जन-मन महिला सेवाभावी संस्था, पाथर्डी. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Collective haldi kunku program in pathardi