esakal | चांदोली धरणग्रस्त विस्थापितांनी केली 25 एकरावर सामुहिक भातशेती
sakal

बोलून बातमी शोधा

Collective paddy cultivation by Chandoli dam affected

मांगले : येथील चांदोली धरणग्रस्त विस्थापितांनी चरितार्थासाठी शेती खंडाने घेऊन सामुहिक प्रयत्नातून ती कसायला सुरवात केली आहे. अशी 25 एकरावर भातशेती त्यांनी केली आहे. 

चांदोली धरणग्रस्त विस्थापितांनी केली 25 एकरावर सामुहिक भातशेती

sakal_logo
By
भगवान शेवडे

मांगले : येथील चांदोली धरणग्रस्त विस्थापितांनी चरितार्थासाठी शेती खंडाने घेऊन सामुहिक प्रयत्नातून ती कसायला सुरवात केली आहे. अशी 25 एकरावर भातशेती त्यांनी केली आहे. 

तीस-पस्तीस वर्षात संपूर्ण शिराळा तालुका भातशेती पिकवणारा तालुका म्हणून परिचित होता. चांदोली धरण निर्माण झाल्यानंतर वारणा नदी बारमाही वाहू लागली. शिराळा तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील शेतक-यांनी ऊस शेतीवर लक्ष केंद्रित केले. ऊसाला फेरपालट म्हणून खोडवा निघाल्यानंतर भाताचे पीक घेणे सुरु केले. एक वर्ष भाताचे पीक घ्यायचे, नंतर दोन वर्षे ऊस. वारणा पट्ट्यातील शेतक-यांचे असेच नियोजन असते. मात्र भाताच्या पिकासाठी मजुरांची कमतरता, करावी लागणारी मेहनत यामुळे ऊसाच्या लागणीनंतर अंतर मशागतीसह इतर आधुनिक तंत्राचा वापर करून कमी कष्टात जास्त उत्पन्न मिळवण्याचा मार्ग स्विकारला आहे. त्यामुळे शेतक-यांची ऊसाच्या शेतीशिवाय इतर पिकांना करावे लागणारे व्याप, मजुरांची कमतरता यामुळे भात शेती न परवडणारी वाटू लागली. 

ताटात भात असल्याशिवाय पोट भरत नाही. त्याचीही खंत होती. दोन-चार वर्षापासून विस्थापित चांदोली धरण ग्रस्त खंडाने शेती कसण्यास घेऊ लागले. या लोकांना विस्थापित होण्याअगोदर मूळ चांदोली धरणाच्या वरच्या गावात भात आणि नाचणी ही पिके घेऊन चरितार्थ चालवावा लागत असे. भात शेती कसण्यात त्यांचा हातखंडा होता. विस्थापित झाल्यानंतरही नव्या गावात मिळालेल्या जमिनीत ते भाताचे पीक घेत होते. आता त्यांची स्वतःची मिळालेली शेती कसतानाच मांगलेतील शेतक-यांची शेती खंडाने सामुहिकरित्या कसण्यासाठी घेऊ लागलेत. 

खुरपणीचा भाग सोडून इतर मशागत, खते, काढणी खंडाने निम्मा निम्मा खर्च करून भाताचे निघणारे उत्पन अर्धे शेतकरी आणि अर्धे कसणारा घेत आहेत. ऊसाच्या शेतीमुळे शेतकरी आळशी बनला. हे वास्तव यातून दिसत असले तरी चांदोली धरणामुळे विस्थापित झालेल्या धरणग्रस्तांकडे शेती कसण्यासाठी, बाहेरील मजुरांशिवाय घरातील लोकांची मदत, कष्ट करण्याची तयारी यामुळे त्यांनी स्वतःची शेती कसत खंडाच्या शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवून संबंधित शेतक-यालाही वर्षभर पुरेल एवढे भाताचे उत्पन्न मिळवून देवून स्वतःचाही फायदा करून घेत आहेत. 

मांगलेत नांदोली वसाहत, हादरेवाडी, शेंडेवाडी ही विस्थापित गावे आहेत. तीनही वसाहतीत मिळून 70 घरे आहेत. 600 वर लोकसंख्या आहे. या वसाहतीतील धरणग्रस्त खंडाने शेती करताना आपल्या शेतीतही ऊसाचे चांगले उत्पन्न घेत आहेत. कष्टाची तयारी, जिद्दीमुळे मूळ गाव धरणात गेल्यानंतर विस्थापित होऊन जमिनी, राहायला घरे मिळेपर्यंत भटके जीवन जगणारे विस्थापित धरणग्रस्त जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

तीनही वसाहतीत मिळून 70 घरे आहे. बहुतेकजण शेतीवर जगतात. मुंबईला काही चाकरमानी आहेत. मूळ गावात कमी क्षेत्रात भाताचे जास्त उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करत असू. आता मजुरांची कमतरता, त्यांची मजुरीची अवास्तव मागणी यामुळे भातशेती करणे परवडत नाही. आम्ही शेतात समुहाने काम करतो. तीनही वसाहतींनी मिळून 20 लोकांनी 25 एकरावर शेती खंडाने घेतलीय. चांगले उत्पन्न घेऊन शेतकऱ्यालाही फायदा करून देत आहोत.
- दगडू लाखन, विस्थापित धरणग्रस्त 

संपादन : प्रफुल्ल सुतार

loading image
go to top