मिरज शासकीय कोविड रुग्णालयाबाबत फडणवीसांसमोर तक्रारींचा पाढा 

प्रमोद जेरे 
Sunday, 30 August 2020

मिरज (सांगली) - मिरज शासकीय कोविड रुग्णालयात रुग्णांची होणारी हेळसांड आणि रुग्णांना मिळणाऱ्या उपचारांबाबत खासदार संजय पाटील यांचेसह उपमहापौर आनंदा देवमाने आणि अन्य लोकप्रतिनिधींनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आज रुग्णालय प्रशासनाचे अक्षरशः वाभाडे काढले. रुग्णालय प्रशासनाकडून दिली जाणारी माहिती निखालस खोटी असल्याचे सांगून उपमहापौर आनंदा देवमाने यांनी वस्तुस्थिती वेगळी असल्याचा स्पष्ट आरोप केला. यावेळी फडणवीस यांनी या सर्व ही परिस्थिती आपणास माहीत असल्याचे सांगून याबाबत आपण शासन स्तरावर पाठपुरावा करू असे आश्वासन दिले. 

जिल्ह्यातील कोरुनाच्या वाढत्या कहराच्या पार्श्‍वभूमीवर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मिरज शासकीय कोविड  रुग्णालयास भेट दिली. यावेळी त्यांचे समवेत खासदार संजय पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, महापौर गीता सुतार उपमहापौर आनंदा देव माने, नगरसेवक गणेश माळी यांचेसह माजी महापौर संगीता खोत आदी मान्यवर उपस्थित होते. रुग्णालय प्रशासनाच्यावतीने अधिष्ठाता सुधीर नणंदकर यांनी रुग्णालयात केले जाणारे उपचार, बरे झालेल्या रुग्णांची संख्या, याबाबतची माहिती दिली.

खासदार संजय पाटील यांनी या माहितीस आक्षेप घेऊन वस्तुस्थिती वेगळी असल्याचे फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले. सांगली जिल्ह्याचे हे मुख्य रुग्णालय असूनही याठिकाणी आणि उपलब्ध सुविधा, मनुष्यबळ, आणि रुग्णांना मिळणाऱ्या उपचारांबाबत प्रचंड सावळागोंधळ असल्याची तक्रार केली. तर उपमहापौर आनंदा देवमाने यांनी रुग्णालय प्रशासनाने दिलेली सर्व माहिती खोटी असल्याचा थेट आरोप केला.

संपूर्ण सांगली जिल्ह्यासह कर्नाटक आणि कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्ण मिरज शासकीय कोविड रुग्णालयात येत आहेत, याशिवाय खाजगी डॉक्‍टरांनी रुग्णांना दाखल करून घेणे बंद केले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसमोर शासकीय रुग्णालयाशिवाय पर्याय नसताना शासकीय रुग्णालयातील यंत्रणा मात्र पूर्ण कोलमडली असल्याचाही आरोप माजी आमदार दिनकर पाटील यांनी यावेळी केला. यावेळी विरोधी पक्षनेते श्री फडणवीस यांनी रुग्णालयातील यंत्रणा सुधारण्यासाठी आपण स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा करू असे आश्वासन दिले. 
 
रुग्णालय टकाटक रुग्णसेवेतही तत्परता 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी रुग्णालयाचा परिसर आज बऱ्यापैकी स्वच्छ करण्यात आला. अन्य वेळी दिसणारे कचऱ्याचे ढिगारे आणि जैविक कचऱ्याची ही योग्य विल्हेवाट लावण्यात आली. शिवाय शुक्रवारी (ता. 28) रात्रीपासूनच रुग्णांना नम्र आणि तत्पर सेवा देण्यात आल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले. 

संपादन : घनशाम नवाथे 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Complaints about Miraj Government Kovid Hospital