कन्नड प्राधिकरण अध्यक्षांचा असा मराठीद्वेष...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 31 January 2020

भविष्यात बेळगावातील सर्व शासकीय कार्यक्रम कन्नड भाषेत आयोजित करण्याची तंबी दिली आहे. या प्रकारामुळे राज्य सरकारचा मराठीद्वेष पुन्हा एकदा उघड झाला आहे.

बेळगाव - राजहंसगडावर आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी शासकीय कार्यक्रम मराठी भाषेतून घेतल्याने कन्नड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष टी. एस. नागभरण यांना पोटशूळ उठला आहे. त्यांनी आज जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांना पत्र पाठवून भविष्यात बेळगावातील सर्व शासकीय कार्यक्रम कन्नड भाषेत आयोजित करण्याची तंबी दिली आहे. या प्रकारामुळे राज्य सरकारचा मराठीद्वेष पुन्हा एकदा उघड झाला आहे.

राजहंसगडावरील फलकामुळे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

राजहंसगड विकास आणि गडावर शिवरायांचा ६५ फुटी पुतळा उभारण्यासाठी राज्य शासनाने तीन कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पर्यटन खात्याकडून तीन कोटी रुपये खर्चून गडाचा विकास केला जाणार असून कन्नड व संस्कृती खात्याच्या माध्यमातून ५० लाख रुपयांतून शिवरायांचा पुतळा गडावर उभारला जाणार आहे. या विकासकामांचा प्रारंभ आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते नुकताच झाला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे सर्व फलक मराठी भाषेत होते. तर कार्यक्रमही पूर्णपणे मराठी भाषेतून झाला होता. येळ्ळूर, राजहंसगड परिसर पूर्णपणे मराठी भाषिक आहे. त्यामुळे
संपूर्ण कार्यक्रम मराठीमध्ये झाला. मात्र, यामुळे कन्नड संघटनांचा तीळपापड झाला होता. आमदार हेब्बाळकर मराठी मतांवर डोळा ठेवून राजकारण करीत असल्याचा आरोपही करण्यात आला.

वाचा - राजस्थान नंतर कर्नाटक वर होतो ००७ गॅंगचा डोळा...

शासकीय कार्यक्रम कन्नडमध्येच घेण्याची तंबी

बेळगावातील एका स्वयंघोषित कन्नड नेत्याने सोशल मीडियावर संदेश टाकून कन्नड आणि संस्कृती खात्याकडून अनुदान मंजूर होऊनही कन्नडमध्ये फलक न लावल्याबद्दल असमाधान व्यक्त केले होते. तसेच राजहंसगडावर योजनेचा तपशील असणारे फलक कन्नडमध्येच लावण्याची मागणी केली. मागणीची पूर्तता न झाल्यास कन्नड संघटनांकडून गडावर कन्नड फलक उभारण्याची दर्पोक्ती केली होती. तसेच गुरुवारी सकाळी त्याने कन्नड विकास प्राधिकरणाकडे लेखी तक्रारही केली होती. याची दखल घेत प्राधिकरणाचे अध्यक्ष नागभरण यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सायंकाळीच पत्र लिहून शासकीय कार्यक्रमात व्यासपीठावरील मराठी फलक लावणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची सूचना केली आहे.

 

राजहंसगडावर मराठी भाषेत झालेल्या शासकीय कार्यक्रमाबद्दल कन्नड विकास प्राधिकरणाकडून अद्याप मला कोणतेही पत्र प्राप्त झालेले नाही. तसे पत्र आले असल्यास कार्यालयातून माहिती घेऊ. याबाबत मला कल्पना नाही.
- डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी, जिल्हाधिकारी

कार्यक्रम केवळ मराठी भाषेत झालेला नाही. प्रोटोकॉलनुसार कन्नड भाषेतही झाला. फलकही कन्नडमध्ये होते. व्यासपीठावरील मराठी भाषेत असलेला फलक हा समर्थकांनी लावलेला होता. याबाबाबत स्पष्टीकरण हवे असल्यास ते देण्यास तयार आहे. यात अधिकाऱ्यांची चूक नाही.
- लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: compulsion of to take Government program in Kannada