फसवणूक टाळण्यासाठी द्राक्ष, डाळींब खरेदीदार व्यापाऱ्यांना नोंदणी सक्तीची

जयसिंग कुंभार
Monday, 28 December 2020

सांगली जिल्ह्यात, डाळिंब द्राक्ष हंगाम सुरू झाला आहे. प्रत्येक वर्षीच शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून फसवणूक टाळण्यासाठी द्राक्ष दलालांना नोंदणी सक्तीची करणे गरजेचे आहे.

 सांगली ः जिल्ह्यात, डाळिंब द्राक्ष हंगाम सुरू झाला आहे. प्रत्येक वर्षीच शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून फसवणूक टाळण्यासाठी द्राक्ष दलालांना नोंदणी सक्तीची करणे गरजेचे आहे. बाजार समित्या, जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा पोलिस प्रमुखांनी संयुक्तपणे मोहिम राबवण्याची गरज आहे. पणन, महसूल, पोलिस यांनी फसवणूक टाळण्यासाठी संयुक्त मोहिम राबवण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. 

द्राक्ष बागायतदारांना दरवर्षी कोट्यवधीचा गंडा घालून दलाल पसार होतात. बाजार समितीच्या दुर्लक्षामुळे हे प्रकार घडतात. जिल्ह्यात जेवढे दलाल येतील. त्याची नोंदणी बाजार समितीत होणे गरजेचे आहे. त्यांचा आधार क्रमांक, मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड, सुरक्षा अनामत म्हणून 25 लाख रुपये, व्यवसायांच्या व कायम रहिवासी असलेल्या ठिकाणांचे पत्ता व लायसन्स (परवाने) खात्रीशीरतेची नोंदणी बाजार समितीकडे भरणे बंधनकारक करावे. जे दलाल अनामत भरणार नाहीत त्यांना खरेदी-विक्री करता येणार नाही, अशी नियमावली सक्तीची करायला हवी. पंचवीस लाखांची अनामत रोख स्वरूपात न घेता डी. डी. स्वरूपात घेणे बंधनकारक करावे. त्यामुळे बॅंक आणि अन्य दस्तऐवज पुरावा उपलब्ध राहणार आहे. दलालाने दिलेली माहिती पुरावा योग्य आहे, का याची पडताळणी आवश्‍यक आहे. त्याची खातरजमा बाजार समितीने करण्याची गरज आहे. 

द्राक्ष, डाळिंब शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकरी कुटुंबाचा संपूर्ण वर्षाचा उदरनिर्वाह त्यावर असतो. द्राक्ष, डाळिंबाचा व्यवहार तोंडी होतो. त्यामुळे बराच वेळा शेतकऱ्यांची लुबाडणूक होते. त्यांचा परिणाम त्यांच्या कुटुंब, दैनंदिन व्यवहारांवर होतो. गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन गावांमध्ये जे व्यापारी खरेदीदार आले आहेत. त्यांच्याशी संपर्क साधून ते कुठून आले आहेत ? किती दिवस राहणार आहेत ? कोणाच्या घरी वास्तव्यास आहेत ? त्यांचा मोबाईल क्रमांक काय ? त्यांच्याबरोबर आणखी कोण कामगार आहेत ? त्यांचे आधारकार्ड रेशनकार्ड झेरॉक्‍स, फोटो घेऊन नोंद ठेवावी. एखाद्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे अथवा शोधणे सोपे होते. 

फसवणूक शेतकरीच टाळू शकतात... 

द्राक्ष, डाळिंबाच्या हंगामात फसवणुकीचे प्रकार यापुर्वीही अनेकदा घडले आहेत. बाजार समित्यांकडे नोंदणी नसलेल्या व्यापाऱ्यांमार्फत शेतमाल विक्रीचे व्यवहार झाल्याने असे प्रकार घडले आहेत. द्राक्ष, डाळिंब पट्‌ट्‌टयात दरवर्षी असे प्रकार घडतात. पोलिस दरवर्षी आवाहन करतात. व्यापारी स्थानिक दलालांना मध्यस्थी करून शेतमाल खरेदी करतात. मात्र नंतर पैसे देण्यास टाळाटाळ करतात. जागृकपणे हे शेतकरीच टाळू शकतात. 

बनावट खरेदीदार, दलालांना शोधून फोढून काढू

द्राक्ष, डाळिंब पट्टयात शेतकऱ्यांना गंडा घालण्यासाठी आलेल्या बनावट खरेदीदार, दलालांना शोधून फोढून काढू. त्याची माहिती शेतकऱ्यांनी कळवणे महत्वाचे आहे. 

- महेश खराडे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

संपादन : युवराज यादव

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Compulsory registration of grape, pomegranate buyer traders to prevent fraud