कवठेमहंकाळ तालुक्‍यात द्राक्षबागायतदारांच्या चिंतेत वाढ 

हिरालाल तांबोळी
Friday, 8 January 2021

कवठेमहंकाळ तालुक्‍याच्या घाटमाथ्यावर पुन्हा ढगाळ वातावरण व तुरळक पावसाने द्राक्षबागायतदार हबकले आहेत. हे वातावरण रब्बी हंगाम व पिकांसाठी पोषक ठरत आहे, असे असले तरी द्राक्षबागायतदारांच्या चिंतेत वाढ झाली आहे. 

घाटनांद्रे : कवठेमहंकाळ तालुक्‍याच्या घाटमाथ्यावर पुन्हा ढगाळ वातावरण व तुरळक पावसाने द्राक्षबागायतदार हबकले आहेत. हे वातावरण रब्बी हंगाम व पिकांसाठी पोषक ठरत आहे, असे असले तरी द्राक्षबागायतदारांच्या चिंतेत वाढ झाली आहे. 

सध्याच्या हवामानाचा वेध घेत द्राक्ष बगायतदार शेतकरी फवारणी यंत्रासह द्राक्षबागेत थांबत आहेत. घाटमाथ्यावर गेली तीन-चार दिवस दिवसभर ढगाळ वातावरण होते. रात्री थंडी व पहाटे दाट धुंके पडत आहे. दरम्यान, सोमवारी रात्री तुरळक पाऊस झाल्याने त्याचा फटका द्राक्षशेतीला बसत आहे. त्यामुळे तयार झालेल्या द्राक्ष घडात पाणी साचने, घड कुजणे, भुरी, करपा, दावण्या, आदी किडी व रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

सध्या आगाप छाटणी घेतलेल्या द्राक्ष बागांचा हंगाम सुरू झाला आहे. तालुक्‍यात द्राक्ष पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. काही बागेत माल तयार होत आहे. त्या द्राक्ष बागांवर पडलेल्या पाऊस व ढगाळ वातावरण याचा परिणाम होतो आहे. भुरी, दाऊनी या रोगाबरोबरच प्रादुर्भावाची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी द्राक्ष पिकाचे संरक्षण करण्यासाठी बागेवर जुन्या साड्यांचा वापर केल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसत आहे. बळीराजाला बदलत्या वातावरणाचा आर्थिक फटका बसत असल्याने आर्थिक जुळवाजुळव करावी लागत आहे. हे वातावरण गहू, शाळू, हरभरा यासारख्या रब्बी पिकांसाठी मात्र पोषक ठरत आहे. त्यामुळे रब्बी पिकांच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्‍यता आहे. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 
सांगली 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Concerns of grape growers increase in Kavthemahankala taluka