घरी उपचार घेणाऱ्या कोरोना रूग्णांची काय आहे परिस्थिती?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 August 2020

रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयातील खाटा कमी पडू लागल्या आहेत

सांगली : महापालिका क्षेत्रात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होऊ लागली. रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयातील खाटा कमी पडू लागल्या आहेत. अशा परिस्थितीत घरी उपचार (होम आयसोलेशन) केले जात आहे. घरी उपचार घेणाऱ्यांकडे  प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. ना औषधे, ना तपासणी यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

हेही वाचा - खासगी सावकारीच्या जोरावर गावागावांत दहशतीचे साम्राज्य...

जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असताना गेल्या महिन्यांपासून महापालिका क्षेत्रात रुग्णसंख्येत तिप्पट वाढ झाली आहे. सद्यस्थितीत पालिका क्षेत्रात तीन हजारवर रुग्णसंख्या झाली आहे. दररोज किमान दीडशे-दोनशेच्या पटीत रुग्ण आढळून येत आहे. यामुळे शहरातील रुग्णालय हाउसफुल्ल झाली आहेत. म्हणूनच प्रशासनाने प्रकृती स्थिर असणाऱ्यांवर घरीच उपचार (होम आयसोलेशन) करण्यास सुरूवात केली आहे. 

घरी उपचार घेणाऱ्या एका रुग्णाने नाव न टाकण्याच्या आटीवर सांगितले, की चार दिवसांपूर्वी त्यांच्या कुटुंबातील साऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. साऱ्यांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांच्यावर घरीच ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. चार दिवस उलटून गेले, तरीही अद्याप कोणत्याही प्रकारचे उपचार अथवा औषधे देण्यात आलेली नाहीत. महापालिकेचे आरोग्यपथकही याठिकाणी फिरकलेले नाही. प्रशासनाच्या कारभाराचा हा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. अशाच पद्धतीने गावभाग, विश्रामबाग, खणभाग परिसरातील हॉटस्पॉटमध्ये दिसून येत आहे. किमान दिवसातून एकदा तरी तपासणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. 

हेही वाचा -  चहाप्रेमींनो आता तुमच्या चहाची टेस्ट बदलणार...

तुम्हीच औषधे घेऊन या! 

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने तपासणीसाठी आलेल्यांना औषधाबाबत विचारणा केली असता, तुम्हीच औषधे घेऊन या, असा अजब सल्ला देण्यात आला. मुळात कोणत्या प्रकारची औषधे घ्यायची, काय काळजी घ्यायची, याबाबत काही न सांगता पॉझिटिव्ह असताना तुम्हीच औषध घेतलेत तरी चाललेल, असा सल्ला दिल्याने खळबळ उडाली आहे.

संपादन -  स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the condition of corona positive patients ignoring the medical officer in sangli