सरकारी, खासगी दवाखान्यांतील सुरक्षेचे ऑडिट करा

विष्णू मोहिते 
Wednesday, 13 January 2021

जिल्ह्यातील सर्व शासकीय, खासगी दवाखान्यांमधील आयसीयू विभागांमध्ये आवश्‍यक असणाऱ्या उपाययोजना तसेच आग प्रतिबंधक व जीव संरक्षण उपाययोजना, नियम यांची अंमलबजावणी केली आहे अथवा नाही याची तपासणी तत्काळ करावी.

सांगली : जिल्ह्यातील सर्व शासकीय, खासगी दवाखान्यांमधील आयसीयू विभागांमध्ये आवश्‍यक असणाऱ्या उपाययोजना तसेच आग प्रतिबंधक व जीव संरक्षण उपाययोजना, नियम यांची अंमलबजावणी केली आहे अथवा नाही याची तपासणी तत्काळ करावी. सरकारी, खासगी दवाखान्यांमधील सुरक्षेचे ऑडिट करावे, अशी मागणी जिल्हा सुधार समितीने केली आहे. याबाबत अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांना समितीने मागण्यांचे निवेदन दिले. 

समितीचे ऍड. अमित शिंदे म्हणाले की, भंडारा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयामध्ये लागलेल्या आगीनंतर रुग्णालयातील सुरक्षा यंत्रणेवर प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे; परंतु एखादी दुर्घटना घडल्यावरच याबाबत चर्चा सुरू होते. कायमस्वरूपी केलेल्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अशा दुर्घटना घडू शकतात. जिल्ह्यातील शिराळा वगळता एकाही शासकीय रुग्णालयात आग प्रतिबंधक व जीव संरक्षण उपाययोजना तरतुदीनुसार उपाययोजना केलेल्या नाहीत. 

खासगी रुग्णालयांची माहितीच मिळत नाही. त्यामुळे शासकीयसह खासगी रुग्णालयांचे फायर ऑडिट होणे व नियमानुसार उपाययोजना केल्या आहेत अथवा नाहीत याची तपासणी करणे आवश्‍यक आहे. यावेळी जयंत जाधव, महालिंग हेगडे, दाऊद मुजावर, सुधीर भोसले, विनायक बलोलदार, रोहित कुंभरकर, सागर माळी, तसेच दत्ता पाटील उपस्थित होते. 

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Conduct security audits in government and private hospitals