गत वर्षीच्या रब्बीच्या विमा परताव्याबाबत संभ्रम 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 September 2020

यंदाच्या रब्बी हंगाम जवळ आला आहे. तरीही गतवर्षीच्या रब्बी हंगामातील मंजूर पिकविम्याची मंजूर रक्कम अद्याप मिळालेली नाही, अश्‍या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. सबंधित कंपन्यांकडून रक्कमा दिल्याचा दावा केला जातो आहे. कृषी विभागातूनही मात्र या रक्कमा तातडीने जमा होतील, असे सांगितले जात आहे. 

सांगली ः यंदाच्या रब्बी हंगाम जवळ आला आहे. तरीही गतवर्षीच्या रब्बी हंगामातील मंजूर पिकविम्याची मंजूर रक्कम अद्याप मिळालेली नाही, अश्‍या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. सबंधित कंपन्यांकडून रक्कमा दिल्याचा दावा केला जातो आहे. कृषी विभागातूनही मात्र या रक्कमा तातडीने जमा होतील, असे सांगितले जात आहे. 

गेल्यावर्षीच्या रब्बी हंगामातील जिल्ह्यातील 29 हजार 814 शेतकऱ्यांनी 79 लाख 28 हजाराचा विमा भरला होता. या शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून 53 कोटी 18 लाख 68 हजार भरपाई मंजूर झाली आहे. मात्र, अनेक शेतकरी वर्षभरापासून या नुकसान भरपाईपासून वंचित आहे. ही नुकसान भरपाईची शेतकरी प्रतीक्षा करू लागले आहेत. पंतप्रधान पीक विमा योजनेचा गहू, ज्वारी, हरभरा, भुईमूग आदी पिकांसह द्राक्ष डाळिंब पिकांसह अन्य पिकांसाठी विमा योजना लागू गेला आहे. रब्बी हंगामासाठी जिल्ह्यातील 29 हजार 814 शेतकऱ्यांनी 18 हजार 416 हेक्‍टर क्षेत्राचा पीक विमा बॅंकेकडे भरला होता. अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते.

 
रब्बी हंगामामध्ये सर्वाधिक जत तालुक्‍यातील 20 हजार 918 शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला होता. या शेतकऱ्यांना 38 कोटी 21 लाख 38 हजार रुपये भरपाई मंजूर आहे. वास्तविक पाहता रब्बी हंगामातील नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणे अपेक्षित होते. परंतु अद्यापही शेतकऱ्याच्या खात्यावर एक वर्ष झाले तरी नुकसान भरपाईची रक्कम वर्ग झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. विमा मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. 
विमा कंपनीशी संपर्क केला असता त्यांनी राज्य शासनाच्या निकषानुसार आम्ही जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा केली असल्याचा दावा केला आहे. परंतु जिल्ह्यातील अनेक शेतकरी रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाई जमा झालेली नाही. त्यामुळे शेतकरी संभ्रमात पडले आहेत. 

 

गतवर्षीच्या रब्बी हंगामातील पीक विमा तालुकानिहाय शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे काम सुरू आहे. लवकर नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. 
सुरेश मगदूम, कृषी उपसंचालक, सांगली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Confusion about last year's rabbi's insurance refund