Karnataka Vidhan Parishad election: काँग्रेस उमेदवाराची संपत्ती १७४३ कोटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काँग्रेस उमेदवाराची संपत्ती १७४३ कोटी
काँग्रेस उमेदवाराची संपत्ती १७४३ कोटी

काँग्रेस उमेदवाराची संपत्ती १७४३ कोटी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : काँग्रेसचे विधान परिषद उमेदवार युसूफ शरीफ यांनी आपली व आपल्या कुटुंबाची १,७४३ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे ते कर्नाटकातील सर्वात श्रीमंत राजकारणी ठरले आहेत.

मूळचे कोलार गोल्ड फिल्ड्स (केजीएफ) येथील रहिवासी असलेले शरीफ हे रिअल इस्टेटमध्ये उतरण्यापूर्वी भंगार विक्रीच्या व्यवसायात होते. मिलर्स टँक बंद रोड येथील रहिवासी असलेले ५४ वर्षीय शरीफ हे विधान परिषदेच्या बंगळूर स्थानिक स्वराजसंघ मतदार संघात काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार शरीफ यांना दोन पत्नी आणि पाच मुले आहेत. त्यांच्याकडे १,७४३ कोटी रुपयांची संपत्ती आहे. ज्यापैकी एकट्या शरीफ यांच्याकडे सध्या १,६४० कोटी रुपयांची जमीन (शेतीसह) आहे.

शरीफ यांची घोषित मालमत्ता काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार (२०१८ मध्ये ८४० कोटी रुपये) आणि भाजपचे विधानपरिषद सदस्य एम. टी. बी. नागराज (२०२० मध्ये ८८० कोटी रुपये) यांच्यापेक्षा जास्त आहे. पाचवीपर्यंत शिकलेले शरीफ उमरा डेव्हलपर्स या रिअॅल्टी फर्मचे मालक असल्याचे सांगितले जाते. इतर पाच खासगी रिअल इस्टेट कंपन्यांमध्येही त्यांची भागीदारी आहे. १२ बँक खात्यांसह, शरीफ यांनी ६७ कोटी रुपयांचे दायित्व घोषित केले आहे. त्यांच्या स्वतःच्या घोषणेनुसार शरीफ यांच्यावर आयकर अधिकाऱ्यांनी छापे टाकले आणि त्यांच्याकडून १३.४३ कोटी रुपयांची कर थकबाकी वसूल केली. शरीफ यांच्यावर आयपीसीच्या विविध कलमांतर्गत चार गुन्हे प्रलंबित आहेत. ते २.०१ कोटी रुपयांच्या रोल्स रॉईसचे आणि प्रत्येकी ४९ लाख रुपयांच्या दोन फॉर्च्युनर्सचे मालक आहेत.

उमेदवारीमुळे काँग्रेस नेत्यांनाही आश्‍चर्य

बंगळूरमधील एका काँग्रेस आमदाराच्या मते, शरीफ हे पक्षातील सक्रिय व्यक्ती नाहीत. खरं तर आम्हाला आश्चर्य वाटले, की पक्षाने त्यांची विधान परिषद निवडणुकीसाठी निवड कशी केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सी. के. जाफर शरीफ रेल्वेमंत्री असताना शरीफ यांनी भारतीय रेल्वेसोबत भंगार करार केला होता.

loading image
go to top