
बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यावर प्रचंड कोंडी
उचगाव: उचगाव मळेकरणी यात्रेला भाविकांच्या प्रचंड गर्दी झाल्यामुळे वाहनांची कोंडी झाली. मंगळवार व शुक्रवार आठवड्यातून दोन वेळा मळेकरणी यात्रा होत असते. यात्रेला बेळगाव तालुका व जिल्ह्यातील यात्रेकरू व भाविक दुचाकी आणि चारचाकीने येत असतात. त्यावेळी बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर वाहनांची प्रचंड कोंडी झाली.
यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांमुळे सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत वाहनांची गर्दी होत आहे. बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील उचगाव फाट्यापासून या रस्त्यावर ती चालत जाणे सुद्धा मुश्कील झाले आहे. या गर्दीमुळे शाळेला जाणाऱ्या लहान मुलांना व विद्यार्थ्यांना वाहनचालक उचगाव फाट्यावरच सोडत आहेत. श्री मळेकरणी देवस्थान कमिटीने पार्किंगची व्यवस्था करणे गरजेचे आहे, अशी मागणी आहे.
मंगळवारी व शुक्रवारी असे दोन दिवस सहा महिने मोठी यात्रा भरते. मळेकरणीच्या आजूबाजूला असलेल्या घरमालकांना व नागरिकांना तसेच गावातील सर्व रहिवाशांना वाहतूक कोंडीचा त्रास होतो. यावर ताबडतोब तोडगा काढणे गरजेचे आहे. भाविकांच्या गाड्या रस्त्यावर पार्किंग करण्यात येत आहेत. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणे कठीण झालेले आहे. मळेकरणी यात्रेच्या आजूबाजूला असलेळ्या मोकळ्यात जागेत बसून मद्यप्राशन करत आहेत. मंदिराचे पावित्र नष्ट करत आहेत. त्याचठिकाणी बाटल्या व साहित्य, ग्लास टाकून जात आहेत. जवळपासच्या सर्व शेतामध्ये दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे. या मद्यपींचा महिलांनाही त्रास होत आहे.
दिवसेंदिवस यात्रेचे स्वरूप वाढत आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवणे कठीण जात आहे. आमराईच्या आजूबाजूला अनेक कार्यालय झाली आहेत. गर्दीमुळे तसेच कोणत्याही कार्यालयाला पार्किंग व्यवस्था नसल्याने त्याचाही त्रास रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना सहन करावा लागत आहे.
गावच्या बसलाही जागा नाही
उचगाव बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात पार्किंग होत आहे. उचगावची बस गावामध्ये येण्याला सुद्धा जागा नसल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. वाहने पुढे-मागे घेणेही अवघड झाले आहे.
Web Title: Congestion Belgaum Vengurla Road
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..