मंत्री जयंत काका म्हणाले, श्रेया भारीच गं, बच्चूभाऊपण हस्ताक्षराच्या प्रेमात 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

श्रेया ही राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील कडू वस्तीवरील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थिनी आहे. ती इयत्ता तिसरीत शिकते. तिच्या हस्ताक्षराबाबतचा व्हिडिओ तिचे वडील गोरक्षनाथ सजन यांनी व्हायरल केला होता. जिल्हा परिषदेच्या शाळेतील ही विद्यार्थिनी असल्याचे त्यांनी त्यावर कॅप्शन लिहिले होते.

नगर ः राहुरी तालुक्यातील श्रेया सजन या चिमुरडीच्या हस्ताक्षराच्या प्रेमात अनेक मंत्री पडले आहे. तिच्या मोत्यासारख्या हस्ताक्षराबद्दल ई सकाळने व्हिडिओसहीत वृत्त प्रसिद्ध केले होते. ते वृत्त सोशल मीडियात कमालीचे व्हायरल होत आहे. ते जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यापर्यंत पोहचले. इतरही मंत्र्यांपर्यंत ते पोहोचले. त्या वृत्ताची दखल घेत अनेक मंत्र्यांनी तिच्या पालकांवर अभिनंदनाचा वर्षाव केला. 
ई सकाळच्या वृत्ताची शाई वाळत नाही, त्या आतच मंत्री मंडळाकडून दखल घेण्यात आली. यामुळे श्रेया सजनचे वडील सदगदीद झाले आहेत. 

श्रेया आहे कुठली 
श्रेया ही राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील कडू वस्तीवरील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थिनी आहे. ती इयत्ता तिसरीत शिकते. तिच्या हस्ताक्षराबाबतचा व्हिडिओ तिचे वडील गोरक्षनाथ सजन यांनी व्हायरल केला होता. जिल्हा परिषदेच्या शाळेतील ही विद्यार्थिनी असल्याचे त्यांनी त्यावर कॅप्शन लिहिले होते. मोबाईलवरील की बोर्डाच्या प्रेमात पडलेल्या सोशल मीडियातील लोकांना हे पटलं नाही. म्हणून श्रेयाच्या वडिलांनी पुन्हा ती लिहित असताना व्हिडिओ शेअर केला. त्याबाबत ई सकाळने सविस्तर व्हिडिओसहीत वृत्त प्रकाशित केले. ते वृत्त अर्थातच मंत्रिमंडळापर्यंत पोहोचले. त्यानंतर श्रेया आणि तिच्या वडिलांवर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. 

जयंत पाटलांचे आले पत्र 
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी श्रेयाच्या नावाने अभिनंदनाचे पत्रच लिहिले. तुझे हस्ताक्षर पाहून खूपच आनंद झाला. या धावपळीच्या जगात सुंदर हस्ताक्षर म्हणजे दुर्मिळ गोष्ट आहे. हे हस्ताक्षर असेच जप. तुझ्या शैक्षणिक कारकीर्दीस शुभेच्छा. आणि पत्राचा शेवट करताना त्यांनी बालमानस जपत, कोणतीही औपचारिकता न ठेवता, प्रोटोकॉल बाजूला सारून तुझाच जयंत काका असे आपुलकीचे शब्द लिहिले आहेत. श्रेयाच्या वडिलांच्या व्हॉटस अॅपवर त्यांनी हे पत्र पाठवले आहे. तसे ते त्यांना यथावकाश मिळेलच. 

बच्चूभाऊंनी लिहिली पोस्ट 
गरिबांचे कैवारी अशी ओळख असलेले मंत्री बच्चूभाऊ कडू यांनीही श्रेयाचे फेसबुकवर पोस्ट लिहित अभिनंदन केले आहे. तिच्यासोबत मोबाईलद्वारे त्यांनी संवादही साधला. याचाही उल्लेख त्यांनी केला आहे. तालुक्यातील मंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही श्रेयाचे अभिनंदन केले आहे. आपल्या श्रेयाच्या हस्ताक्षराचा व्हिडिओ व्हायरल होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. 

अमेरिकेतून श्रेयाला गिफ्ट 
अमेरिकेतील व्यावसायिक रोहन काळे यांच्यापर्यंत श्रेयाच्या बातमीचा व्हिडिओ पोहचला. त्यांनी गोरक्षनाथ सजन यांच्याशी संपर्क साधून श्रेयाला अमेरिकन कंपनीचे कॅलिओग्राफीसाठी कट नीबचे पेन पाठवले आहेत. दुसरे म्हणजे टाटा मोटर्स जनरल मनेजर राकेश पवार हेही प्रभावित झाले आहेत. त्यांनी सजन यांचा मोबाईल नंबर मिळवला व त्यांना बँक अकाउंट नंबर मागितला. त्यांना श्रेयाला आर्थिक मदत द्यायची होती. परंतु गोरक्षनाथ सजन यांनी अकाउंट नंबर देण्यास नम्रपणे नकार दर्शवला. आम्ही हे केवळ हस्ताक्षराच्या प्रचार व प्रचारासाठी केले आहे. श्री. पवार म्हणाले मलाही दोन मुली आहेत. तुम्ही हस्ताक्षराबाबत करता आहात ते काम मोठे असल्याचेही त्यांनी कौतुक केले. इतर लोकांकडून आतापर्यंत शेकडो फोन आले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congratulations to Shreya Sajan from Jayant Patil