esakal | महापालिका स्थायी सभापतीसाठी 'काँग्रेस-भाजप'मध्ये जुंपणार
sakal

बोलून बातमी शोधा

Congress-BJP

तीन वर्षापूर्वी महापालिकेत सर्वाधिक 41 जागा जिंकून भाजप पूर्ण बहुमताने सत्तेत आले होते.

महापालिका स्थायी सभापतीसाठी 'काँग्रेस-भाजप'मध्ये जुंपणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : सांगली, मिरज कुपवाड शहर महापालिकेच्या (Sangli Update) स्थायी समिती सभापती पदासाठी भाजप आणि काँग्रेस उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. काँग्रेसने या निवडणुकीसाठी फिरोज पठाण यांची उमेदवारी जाहीर केली आहे. (Sangli Election 2021) आज दुपारी पठाण यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महापालिकेचे विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, उपमहापौर उमेश पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते (NCP) मैनुद्दीन बागवान तसेच नगरसेवक संतोष पाटील, करण जामदार, नर्गिस सैय्यद, संगीता हारगे, मनगु सरगर, काँग्रेसचे अमर निंबाळकर, रवींद्र वळवडे आदी उपस्थित होते.

महापालिकेत स्थायी समितीमध्ये एकूण 16 सदस्य आहेत. तीन वर्षापूर्वी महापालिकेत सर्वाधिक 41 जागा जिंकून भाजप पूर्ण बहुमताने सत्तेत आले होते. मात्र सहा महिन्यापूर्वी झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी (Congress-NCP) आघाडीने भाजपचे सहा सदस्य फोडून सत्तांतर घडवून महापालिकेची सत्ता हस्तगत केली होती. त्यामुळे महापौरपद सध्या राष्ट्रवादीकडे असून विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडेच आहे. मात्र संख्याबळाच्या जोरावर भाजप अजूनही स्थायी समितीमध्ये वर्चस्व राखून आहे.

हेही वाचा: शिक्कामोर्तब! महिलांसाठी NDAतून सैन्यात अधिकारी होण्याचा मार्ग खुला

स्थायी समितीमध्ये भाजपचे नऊ तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे एकूण सात सदस्य आहेत. स्थायी समिती सभापतिपद काँग्रेसला देण्याचे आघाडीचे धोरण असल्याने या निवडणुकीसाठी काँग्रेसने फिरोज पठाण यांना उमेदवारी दिली आहे. स्थायी समिती मध्येही सत्तांतर करण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न चालवले होते. मात्र भाजपने आठ दिवसांपूर्वीच आपले स्थायी समितीचे सर्व सदस्य एकत्रित हैदराबाद येथे हलवल्याने त्यांच्या खेळीत यश येत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे स्थायी समिती भाजपकडेच राहणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

उद्या गुरुवारी सकाळी 11 वाजता सभापती निवडीसाठी स्थायी समितीची विशेष सभा होणार आहे. यासाठी पीठासन अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांची विभागीय आयुक्तांनी नेमणूक केली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सभेत सुरवातीचे 15 मिनिटे अर्ज छाननीसाठी ठेवण्यात आले आहेत. त्यानंतर उमेदवारी माघार घेण्यासाठी 15 मिनिटांचा वेळ देण्यात येणार असून त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने मतदान होणार आहे. ही विशेष सभा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असल्याने भाजपने आपले सर्व सदस्य निवडणूक होईपर्यंत बाहेरच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्व सदस्य उद्या सोलापुरातून अथवा इतर ठिकाणाहून ऑनलाइन पद्धतीने या निवडणूकीत मतदान करणार आहेत.

हेही वाचा: रशियाच्या मंत्र्याचे निधन; कॅमेरामनला वाचवताना दुर्घटना

loading image
go to top