
कर्नाटकवासीयांना पाच योजनांची हमी; मोफत बसप्रवास, अन्नभाग्य योजनांचा समावेश
बंगळूर : विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसने राज्यातील जनतेला दिलेल्या पाच हमी योजनांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार प्रत्येक घराला २०० युनिट मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. १५ ऑगस्टपासून गृहलक्ष्मी योजना कार्यान्वित करून कुटुंब प्रमुख महिलेच्या खात्यावर दरमहा दोन हजार रुपये जमा करण्यास अनुमोदन दिले.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली आज पाच तास झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निवडणुकीत जाहीर केलेल्या सर्व पाच हमी योजना लागू करण्याचा निर्णय झाला. निवडणुकीच्या काळात जनतेला दिलेल्या सर्व हमी योजना यंदाच्याच आर्थिक वर्षात लागू केल्या जातील, अशी ग्वाही सिद्धरामय्या यांनी बैठकीनंतर दिली.
बसमध्ये निम्या जागा पुरुषांसाठी राखीव
कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या (केएसआरटीसी) बसमध्ये ५० टक्के जागा पुरुषांसाठी राखीव राहणार आहेत. मोफत बसप्रवासाची सवलत तृतीयपंथीयांनाही मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
बजरंगदल, भाजपलाही योजना मोफत
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज पाच महत्त्वाच्या हमींच्या अंमलबजावणीची घोषणा केल्यानंतर भाजप, बजरंग दलाच्या बेरोजगारांसाठीही ‘युवा निधी’ दिला जाणार आहे, असे सांगत काँग्रेसने भाजपला चिमटा काढला. काँग्रेसने ट्विटमध्ये म्हटले आहे की, आम्ही बोलतो तसे चालतो. आम्ही शब्द पाळतो. पाच हमी योजना लागू करून आम्ही इतिहास रचला आहे.
ही आमची बांधिलकी आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटीलजी तुमच्या घरालाही २०० युनिट वीज मोफत, ‘बसवराज बोम्मईजी तुमच्या घरालाही मोफत वीज’, शोभा करंदलाजेजी तुम्हालाही बसप्रवास मोफत आणि सी. टी. रवीजी तुमच्या घरातील प्रमुख गृहिणीलाही दोन हजार रुपये मोफत देण्यात येतील, असे सांगत काँग्रेसने चिमटा काढला.
मुख्यमंत्र्यांनी दिली पाच योजनांची माहिती
गृहज्योती ः पहिली हमी म्हणून गृहज्योती योजना एक जुलैपासून लागू केली जाईल. १२ महिन्यांची सरासरी घेऊन त्यावर दहा टक्के अधिक जोडून संपूर्ण वीज बिल माफ केले जाईल. जुनी वीज बिले ग्राहकांनी स्वतः भरावीत. जुलै महिन्याचे वीज बिल भरण्याची गरज नाही.
गृहलक्ष्मी ः ही योजना १५ ऑगस्टपासून राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत ‘बीपीएल’ आणि ‘एपीएल’ खातेदारांच्या प्रमुख महिलेच्या खात्यात पैसे जमा केले जातील. परंतु अशा लाभार्थींनी १५ जून ते १५ जुलै दरम्यान अर्ज करावेत. पेन्शन लाभार्थींनाही ही योजना लागू होणार आहे.
अन्नभाग्य ः सर्व दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिकाधारक आणि अंत्योदय लाभार्थींना एक जुलैपासून तृतीय हमी अन्नभाग्य योजनेंतर्गत प्रत्येकी दहा किलो तांदूळ देण्यात येणार आहे.
शक्ती ः विद्यार्थिनींसह समाजातील सर्व महिला कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या(केएसआरटीसी) आणि बंगळूर महानगर परिवहन महामंडळाच्या (बीएमटीसी) बसमध्ये मोफत प्रवास करण्याची सुविधा देणारी शक्ती योजना चालू महिन्याच्या ११ तारखेला सुरू होणार आहे.
युवा निधी ः २०२२-२३ मध्ये उत्तीर्ण झालेल्या बेरोजगार पदवीधरांना नोंदणी झाल्याच्या २४ महिन्यांपर्यंत प्रति महिना तीन हजार रुपये मानधन आणि पदविकाधारकांना पंधराशे रुपये युवा निधी (गौरवधन) दिले जाईल. हे व्यावसायिक शिक्षणासह सर्व बेरोजगार पदवीधरांना लागू असेल. या योजनेंतर्गत तृतीयपंथीयांनाही बेरोजगारी भत्ता दिला जाईल. त्यासाठी अर्ज मागविण्यात येणार आहेत.