जयंतरावांच्या धक्कातंत्रानंतर कॉंग्रेस नेते सावध 

घनश्‍याम नवाथे 
Saturday, 29 August 2020

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाला मुदतवाढ न देता प्रशासक नियुक्त करून पालकमंत्री जयंत पाटील यांनी कॉंग्रेसला धक्का दिला. प्रभारी पणन मंत्रिपदाचा कार्यभार पाहताना जयंत पाटील यांनी संधी मिळाल्यामुळे पाच वर्षांपूर्वीच्या बाजार समिती निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढला, अशीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सांगली : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाला मुदतवाढ न देता प्रशासक नियुक्त करून पालकमंत्री जयंत पाटील यांनी कॉंग्रेसला धक्का दिला. प्रभारी पणन मंत्रिपदाचा कार्यभार पाहताना जयंत पाटील यांनी संधी मिळाल्यामुळे पाच वर्षांपूर्वीच्या बाजार समिती निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढला, अशीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे नेते सावध झाले आहेत; परंतु आता प्रशासक मंडळ नियुक्त करताना राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या कॉंग्रेसला बरोबर घेऊन जावे लागेल, अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे प्रशासक मंडळ नियुक्त करताना "फिफ्टी-फिफ्टी'चा फॉर्म्युला वापरला जाण्याची शक्‍यता आहे. 

कृषी उत्पन्न बाजार समितीची 2015 ची निवडणूक प्रतिष्ठेची आणि चुरसीची बनली होती. कारण कॉंग्रेसचे दिवंगत नेते डॉ. पतंगराव कदम, माजी मंत्री अजितराव घोरपडे, आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या पॅनेलविरुद्ध पालकमंत्री जयंत पाटील, माजी आमदार विलासराव जगताप आणि दिवंगत नेते मदन पाटील यांच्या पॅनेलने निवडणूक लढवली. मिरज, जत आणि कवठेमहांकाळ कार्यक्षेत्र असलेल्या या निवडणुकीत डॉ. कदम, घोरपडे आणि आमदार सावंत यांनी अनुभव पणाला लावत 17 पैकी 14 जागांवर विजय मिळवला. तर पालकमंत्री पाटील यांच्या पॅनेलला तीन जागांवर समाधान मानावे लागले होते. 

अडीच वर्षांपूर्वी बाजार समितीतील राजकारणाला कलाटणी मिळाली. विरोधी गटातील दिनकर पाटील यांना सभापतिपदाची लॉटरी लागली. त्यानंतर सत्ताधारी व विरोधक एकत्र आले होते; परंतु लोकसभा निवडणुकीवेळी सभापती पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून सर्वांना धक्का दिला. त्यांनी भाजपत प्रवेश केला असला तरी सर्व राजकीय नेतेमंडळींशी जुळवून घेतले होते. संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर मुदतवाढ मिळेल, अशी सर्वांना अपेक्षा होती. प्रभारी पणनमंत्रीपद सांभाळणाऱ्या जयंत पाटील यांच्याकडे सहकार राज्यमंत्री डॉ. विश्‍वजीत कदम व आमदार विक्रमसिंह सावंत यांनी मुदतवाढीसाठी फिल्डिंग लावली. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही शब्द टाकला. परंतू बाजार समिती निवडणुकीतील पराभवाची आठवण आणि सभापतींची भाजपशी सलगी लक्षात घेत जयंत पाटील यांनी प्रशासक नियुक्तीचा निर्णय घेतला. 

पालकमंत्री पाटील यांनी प्रशासक नियुक्त करून कॉंग्रेसला धक्का दिल्याचे मानले जात असून कॉंग्रेसचे नेते सावध झाले आहेत. त्यामुळे आता प्रशासक मंडळ नियुक्तीसाठी त्यांना कॉंग्रेसला विचारात घेणे क्रमप्राप्त बनल्याचे मानले जात आहे. राज्यात सत्तेत ते एकत्र आहेत. त्यामुळे प्रशासक नियुक्तीत जयंत पाटील यांनी बाजी मारली असली तरी प्रशासक मंडळ नियुक्तीमध्ये "फिफ्टी-फिफ्टी' फॉर्म्युला वापरावा लागणार आहे. मंडळ नियुक्त करताना मुदत संपलेल्या संचालकांऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल, असे समजते. त्यामुळे ठराविक कालावधीसाठी का होईल प्रशासक मंडळात समावेश करण्यासाठी दोन्ही कॉंग्रेसमध्ये हालचाली वाढल्या आहेत. 

कोल्हापूरप्रमाणे फॉर्म्युला शक्‍य... 
कोल्हापूर बाजार समितीमध्ये 21 जणांचे संचालक मंडळ होते. तेथे आता 13 जणांचे प्रशासक मंडळ नियुक्त केले आहे. सांगली बाजार समितीमध्ये 21 जणांचे संचालक मंडळ होते. त्यामुळे येथेही 13 जणांचे प्रशासक मंडळ नियुक्त केले जाईल. त्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी सहा अशासकीय सदस्य आणि शिवसेनेचा एक सदस्य असाही "फॉर्म्युला' वापरला जाऊ शकतो. लवकरच पणन विभागाकडे प्रशासक मंडळाची यादी पाठवली जाईल. त्यानंतर अधिसूचना काढून प्रशासक मंडळ कार्यरत होऊ शकते. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress leaders wary after Jayantarao's coup